कागल (जिल्हा कोल्हापूर) : अयोध्येतील श्रीराम मंदिर १५ किलोमीटरवरून दिसत होते. एवढी त्याची भव्यता होती; मात्र ते तोडून तेथे मशिदीची निर्मिती झाली. न्यायालयाला मी १ कोटी ८१ लक्ष ६० सहस्र ६५ वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदिराच्या अस्तित्वाचे दाखले दिले आहेत. त्यामुळेच एक मुसलमान आणि २ हिंदु न्यायाधीश यांनी श्रीराम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. आता सर्वोच्च न्यायालयातही आम्हीच जिंकू आणि ६ डिसेंबर २०१८ नंतर श्रीराम मंदिराची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होऊन २०१९ पर्यंत राममंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास श्रीराम मंदिर न्याय समितीचे अध्यक्ष आणि माजी खासदार स्वामी रामविलास वेदांती यांनी व्यक्त केला.
कणेरी (तालुका करवीर) येथील कारागीर महाकुंभ सांगता समारंभात नागरिकांच्या आग्रहास्तव श्रीराम मंदिर विषयावर ते बोलत होते. या वेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी प्रमुख उपस्थित होते. स्वामी वेदांती म्हणाले की, आयुष्याच्या शेवटपर्यंत राममंदिरासाठी लढत रहाणार आहे. फाशी जाईन; मात्र रामलीला सोडणार नाही. श्रीराम मंदिरप्रश्नी कित्येक वेळा कारागृहात गेलो. श्रीराम मंदिरासाठी विरोधी बाजूने २०० वर्षांपूर्वीचे दाखले दिले; मात्र आम्ही वाल्मीकी रामायणातील १ कोटी ८१ लक्ष ६० सहस्र ६५ वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदिराच्या अस्तित्वाचे दाखले दिले आहेत. त्यामुळेच एका न्यायालयात आमचा विजय झाला आहे. कपिल सिब्बल आतंकवाद्यांकडून पैसे घेऊन देशाची सांप्रदायिकता बिघडवत आहेत; मात्र काही झाले, तरी २०१९ पूर्वी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारलेच जाईल.
कणेरी मठावर आल्यावर देशातील जुन्या गावांची आठवण होते. १५ सहस्र लिटर गोमूत्रापासून १ किलो सोने या ठिकाणी मिळवून दाखवले आहे. पंतप्रधान मोदी यांना हे दाखवण्यासाठी आणूच, तसेच कारागीर मंत्रालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही श्री. वेदांती यांनी या वेळी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात