जळगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जळगाव : एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्या ९ सहस्र ७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही मारले गेले, म्हणून सैन्यावर गुन्हे प्रविष्ट केले जातात, हे अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. सैन्याचा संयम सुटण्याआधी, काश्मीरमध्ये सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी केली. हे आंदोलन महानगरपालिकेसमोर, जळगाव येथे १७ फेब्रुवारीला करण्यात आले.
आंदोलनाच्या ठिकाणी देशभक्त चंदन गुप्ता यांच्या चेहर्याचा मुखवटा लावलेले ३ कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘आमच्या राज्यकर्त्यांनी जर पाकिस्तानशी निष्ठा वाहणारे वेळीच पकडले असते, तर कदाचित चंदन गुप्ता आज जिवंत असता. या देशात तिरंगा ध्वज पकडणार्याला बंदुकीच्या गोळ्याच खाव्या लागणार आहेत का ?’ असे ज्वलंत विचार लिहिलेले फलक या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात घातले होते.
या आंदोलनाला विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, जय माता दी ग्रुप, सिंधू सेना, शिवस्मारक समिती (भुसावळ), जय भवानी ग्रुप, सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, तसेच नांद्रा, खेडी-कडोली, पाळधी आदी गावांतून धर्मप्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर येथील उपजिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांनाही हिंदुत्वनिष्ठांनी वरील मागण्यांचे निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात