सांगली : श्री. नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदुत्वावर आक्रमण केले जात होते. आता ते सत्तेत आल्यावर थेट राष्ट्रवादावरच आक्रमण करून तो दुर्बळ करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. भारतविरोधी घोषणा देणारे अयोग्य कृती करत आहेत, असे न्यायालय, पोलीस, शासन सांगत नाहीत. कोणतेही शासन त्यांची धोरणे पालटत नाहीत. त्यांनी देशप्रेमाविषयी कृती करायला हवी, अशी धोरणे बनवण्यास भाग पाडणारी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे, हेच आजच्या तरुणांचे खरे कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी केले. ते श्रीशिवप्रतिष्ठानच्या इतिहास अभ्यास परिषदेत हिंदुत्व आणि आजची स्थिती या विषयावर बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. हिंदु समाजाने आजपर्यंत अयोग्य घडणार्या गोष्टींना का ? असा प्रश्न विचारला नाही; मात्र १६ व्या शतकात हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारल्यानेच ते परिस्थिती पालटू शकले.
२. आज आपण सत्य बोलायला घाबरतो. भारत तेरे तुकडे होंगे या घोषणेला देशद्रोही म्हणायचे कि नाही, यावर चर्चा करतो. तुम्ही हिंदू आणि भारतीय आहात, ही ओळख पुसण्याचे षड्यंत्र चालू आहे. अयोग्य गोष्टींना न्यायालय, पोलीस, राज्यकर्ते रोखू शकत नाहीत, म्हणजेच अराजकाची स्थिती आहे. शत्रूच्या धर्मनिष्ठा ढासळून टाकून तेथे आपल्या धर्मनिष्ठा रुजवणे म्हणजे जिहाद होय !
३. स्वातंत्र्य हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. धर्मपालन करा, असे सांगण्यासाठी कोणाला फतवा काढावा लागत नाही.
४. जो हिंदुविरोधी बोलतो, त्याचा आपण पराभव केला पाहिजे. हिंदु आहोत, असे अभिमानाने सांगा.
५. ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून आज बहुराष्ट्रीय आस्थापने देशाला लुटत आहेत. हे अत्यंत घातक असे छुपे आक्रमण असून दोन वर्षांनी आपल्या आजूबाजूची सर्व लहान लहान दुकाने आणि उद्योगधंदे बंद पडतील.
छत्रपती संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळणे, हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रणनीतीचाच भाग ! – भारताचार्य सु.ग. शेवडे
छत्रपती संभाजी महाराज यांची इतिहासकारांनी अपकीर्ती केली. त्यांच्यावर खोटे आरोप केले. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण स्वारी करून आल्यानंतर स्वराज्यासाठी किमान एक वर्षे युद्ध टाळणे आवश्यक होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना जाऊन मिळण्याचे नाटक केले. हा एकप्रकारे शिवाजी महाराजांच्या रणनीतीचाच भाग होता. आपल्याला आर्य बाहेरून आले, अशी खोटी माहिती सांगितली जाते. प्रत्यक्षात आर्य इथलेच असून धर्माचरण करणारा म्हणजे आर्य होय. बुद्धीप्रामाण्यवादी, पुरोगामी पाश्चिमात्यांकडून पैसे घेऊन हिंदु धर्माची नासाडी करण्याचे काम करत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही केवळ परमेश्वरकृपेमुळेच मी हिंदु धर्मप्रसाराचे काम करू शकतो.
श्रीशिवप्रतिष्ठानविषयी गौरवोद्गार काढतांना श्री. भाऊ तोरसेकर म्हणाले, तुमच्यापैकी कुणीही पद, अनुदान, सत्ता मागत नाही. तुमच्यामध्ये राष्ट्र-धर्म कार्य करणारे तरुण आहेत. हेच श्रीशिवप्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे. भारताचार्य सु.ग. शेवडे म्हणाले, पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी राष्ट्रनिष्ठा जपणारे तरुण निर्माण केले आहेत. राष्ट्रनिष्ठा जपणार्या संघटनेत असल्याने तुम्ही भाग्यवान आहात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात