जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
संभाजीनगर/सांगली : राज्यातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा देणे धर्मादाय रुग्णालयांना बंधनकारक असून त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने गेल्या ३ वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केली नाही, तसेच एकही अहवाल शासनास दिलेला नाही. त्यामुळे सध्याच्या डॉ. लहाने समितीकडून काम करून घ्यावे अथवा समितीतील निष्क्रीय सदस्य तातडीने पालटावे, अशा मागणीचे निवेदन संभाजीनगर आणि सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
संभाजीनगर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना भाजप युवा अध्यक्ष श्री. अजिंक्य देशपांडे, रणरागिणी शाखेच्या सौ. आनंदी वानखेडे, सनातन संस्थेचे श्री. प्रकाश कुलकर्णी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मादाय रुग्णालय नियंत्रण समितीच्या विरोधात जळगाव येथे आंदोलन !
जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत टॉवर चौक, जळगाव या ठिकाणी १८ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. लहाने समितीची निष्क्रीयता दर्शवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या एका युवकाला ‘हाल होत असलेला गरीब रुग्ण’ बनवून झोपलेले दाखवण्यात आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये विविध मागण्यांचे फलक धरले होते. समाजातील लोकांना याविषयी जागृत करून त्यांच्या स्वाक्षर्याही गोळा करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात