शासनाच्या अनास्थेविषयी ‘सुराज्य अभियाना’तून जनजागृती
कोल्हापूर : धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रणसाठी शासनाने नेमलेली डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ आधुनिक वैद्यांची समिती ३ वर्षे निष्क्रीय राहिली. हिंदु जनजागृती समितीने स्वतः पुढाकार घेऊन एप्रिल २०१७ आणि डिसेंबर २०१७ मध्ये राज्य साहाय्यित धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन अभ्यास केला असता बर्याच रुग्णालयांत शासकीय योजनेची प्रसिद्धी होत नसल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर या तज्ञ आधुनिक वैद्यांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. यासाठी डॉ. लहाने समिती रहित करावी, अशी मागणी विहिंपचे शहरप्रमुख श्री. अशोक रामचंदानी यांनी येथे केली. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी चालू असलेल्या योजनांचा लाभ मिळावा आणि संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी २० फेब्रुवारीला येथील शिवाजी चौक येथे सकाळी ११.३० वाजता आंदोलन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत हे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
मान्यवरांचे मनोगत
१. श्री. गोविंद देशपांडे : धर्मादाय रुग्णालये लोकांची फसवणूक करत आहेत. गरीब रुग्णांसाठी त्यांनी शासनाचे नियम पाळायला हवेत.
२. सौ. मंजुषा खाडये : धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर उपचार होतात अथवा नाही, हे पहाणारी डॉ. लहाने समिती कालबाह्य ठरली आहे.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. या समितीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी या समितीचा कार्य आढावा, चौकशी अहवाल आणि केलेली कारवाई प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस द्यावी.
२. सामान्य रुग्णांच्या तक्रारी धर्मादाय रुग्णालयांकडून सोडवल्या जात नसल्यास त्या रुग्णांना या तज्ञांच्या समितीकडे थेट तक्रारी याव्यात, यासाठी व्यवस्था निर्माण करावी.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
या आंदोलनात शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बिडकर, हिंदु महासभेचे सरोज फडके, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती सुवर्णा पोवार, शहरप्रमुख श्री. मनोहर सोरप, हिंदुत्वनिष्ठ श्री. विश्वनाथ शेट्टी, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, मधुकर नाझरे आदी हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात