Menu Close

देवनिधीवर डल्ला मारणार्‍या श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या भ्रष्ट माजी विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा ! – श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून अपहार !

देवनिधीचा अपवापर होत असल्याचे भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या सरकारच्या का लक्षात आला नाही ? –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

डावीकडून बजरंग दलाचे श्री. शिवकुमार पांडे, श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. अजय संभूस, भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, समितीचे सदस्य डॉ. अमित थडाणी आणि सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर हे समस्त गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून गणेशभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक मंदिराच्या न्यासाच्या केलेल्या तपासणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये १ जानेवारी २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत या न्यासाच्या विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांच्या संदर्भातील अभ्यासदौर्‍याच्या नावाखाली ८ लाख ११ सहस्र २५९ रुपये आणि वाहकाला अधिकचा भत्ता म्हणून ४ लाख ८० सहस्र ४० रुपये, असा एकूण १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपये इतका खर्च केला आहे. यामध्ये लॉजिंग, खानपान इत्यादी खर्चाचाही समावेश आहे. धक्कादायक गोेष्ट म्हणजे श्री सिद्धीविनायक मंदिर कायदा हा विश्‍वस्तांना अशा प्रवासखर्चाची अनुमतीच देत नाही. यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते. त्यामुळे विनाअनुमती अभ्यास दौर्‍यांवर मंदिर विश्‍वस्तांनी केलेला खर्च नियमबाह्य आहे. याशिवाय जलयुक्त शिवाराचे पैसे राज्यशासनालाच दिले आहेत, तर दौरा करायची आवश्यकता काय होती ? हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी संबंधित विश्‍वस्तांवर फसवणूक आणि अफरातफर यांचे गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत, अशी मागणी ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’चे कायदेशीर सल्लागार तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली.

श्री सिद्धीविनायक मंदिराच्या माजी विश्‍वस्तांनी मंदिराच्या देवनिधीत केलेल्या अपहाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी गणेशभक्तांच्या वतीने समिती स्थापना करण्यात आली.  समितीने २० फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेला ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’चे समन्वयक श्री. अजय संभूस, समितीचे सदस्य आणि देवस्थान भ्रष्टाचाराचे अभ्यासक डॉ. अमित थडाणी, बजरंग दलाचे श्री. शिवकुमार पांडे, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. शंभू गवारे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पुढे म्हणाले,

१. ‘‘वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्‍वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा केला; मात्र प्रत्यक्षात त्यांनी दौर्‍याचे दिलेले एक देयक गोवा राज्यातील एका हॉटेलचे आहे. मुंबई ते मिरज या प्रवासात गोवा येते का? यातून ‘अभ्यासदौर्‍याच्या नावाखाली ते गोव्यात मौजमजा करण्यासाठी गेले होते का ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो.

२. नाईक यांच्याप्रमाणे हरिश सणस या विश्‍वस्तांनीही याच कालावधीत भाड्याने गाडी करून मुंबई ते मिरज असा दौरा विनाअनुमती केला. दोघांनी एकाच कालावधीत एकाच मार्गाने प्रवास केला, मग सणस यांनी केलेल्या भाड्याच्या गाडीतून दोघांनी एकत्रित का प्रवास केला नाही ? मंदिराच्या अर्पणाचा अपव्यय करणे, ही देवनिधीची लूट आणि शासनाची फसवणूक आहे, तसेच श्रद्धेने धन अर्पण करणार्‍या भाविकांचा विश्‍वासघात आहे.

३. २ ते ४ डिसेंबर २०१३ या कालावधीत तत्कालीन विश्‍वस्तांनी तिरुपती देवस्थानची पाहणी करण्यासाठी विमानदौरा केला. विमानाने खर्चिक प्रवास करून विश्‍वस्तांनी मंदिराच्या पैशांची उधळपट्टी का केली ? दौर्‍यासाठी विश्‍वस्त मंडळाने शासनाची अनुमती का घेतली नाही ? पाहणी अहवाल तर अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे इतक्या खर्चाची आवश्यकता नव्हती, हे स्पष्ट होते. देवनिधीचा अपहार केलेल्या माजी विश्‍वस्तांकडून तो वसूल करायला हवा.

४. शासन या प्रकरणी जागृत नव्हते; परंतु ऑगस्ट २०१६ मध्ये मंदिर न्यासाच्या निरीक्षण अहवालामध्ये न्यासाला दिलेल्या सूचना विश्‍वस्तांचा अपप्रकार उघड करणार्‍या आहेत. यात म्हटले आहे, ‘शासनाने विशेषत्वाने आदेश दिल्याविना न्यासाच्या निधीतून कोणत्याही स्वरूपाचे दौरे आयोजित करण्यात येऊ नयेत. अपवादात्मक परिस्थितीत दौर्‍याची आवश्यकता भासल्यास विभागाकडून पूर्वमान्यता घेण्यात यावी, वाहन वापर आणि वाहनचालक यांच्या अतीकालीन भत्त्यांवर नियंत्रण ठेवण्यात यावे’, अशी धक्कादायक टिप्पणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा कार्योत्तर खर्च संमत करू नये, तसेच भ्रष्टाचाराला संमती देऊ नये आणि शासनाच्या अनुमतीविना केलेला देवनिधीतील अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करून संबंधित विश्‍वस्तांकडून तो पैसा वसूल करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडेही करत आहोत.’’

कोट्यवधी रुपयांचा निधी राजकीय स्वार्थापोटी अनेक संस्थांना देण्यात आल्याचे उघड ! – डॉ. अमित थडाणी

माजी न्यायमूर्ती टिपणीस समितीच्या अहवालातील उदाहरणे देतांना मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांचे अभ्यासक डॉ. अमित थडाणी म्हणाले, ‘‘श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाने द्यायची देणगी शासनाचे विधी आणि न्याय खाते संमत करत होते. त्या काळात गोविंदराव आदिक हे राज्याचे विधी आणि न्याय मंत्री, तर दिलीपराव सोपल हे राज्यमंत्री होते. त्यांच्या न्यासाला अनुक्रमे ५० लाख आणि २० लाख रुपये देणगी देण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी तातडीचे कारण देत राजकीय स्वार्थापोटी अनेक संस्थांना देण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच न्यासाच्या कारभारावर टिपणीस समितीने ताशेरे ओढले आहेत; मात्र यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही. हे अत्यंत गंभीर आहे.’’

भक्तांनी अर्पण केलेल्या धनावर डल्ला मारून विश्‍वस्तांकडून भाविकांच्या श्रद्धेवरच घाला ! – शिवकुमार पांडे, बजरंग दल

मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांचा अपप्रकार पहाता ‘कुंपणच शेत खाते’ या म्हणीचा प्रत्यय येतो. भक्तांनी अर्पण केलेल्या धनावर डल्ला मारून विश्‍वस्तांनी भाविकांच्या श्रद्धेवरच घाला घातला आहे. घराच्या मालकानेच घर लुटण्याचा हा प्रकार एखाद्या चोराने केलेल्या चोरीपेक्षाही भयंकर आहे.’’

शासनाने या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई न केल्यास  तीव्र आंदोलन छेडू ! – अजय संभूस, समन्वयक, श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी समिती

देवनिधीची लूट करणे, हे महापाप आहे. वाममार्गी महापाप्यांना वक्रतुंड गणराया शिक्षा करीलच; पण मंदिरांचे सरकरीकरण केल्यामुळे चालू असलेली ही लूट रोखणे शासनाचेही दायित्व आहे. शासनाने या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत. जर शासनाने या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली नाही आणि देवनिधी वसूल केला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.

‘याप्रकरणी आम्हीही विरोध करणार आहोत’, असे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. शंभू गवारे यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *