भंग पावलेल्या मूर्तींचे हिंदु जनजागृती समितीकडून पोलिसांच्या साहाय्याने नदीमध्ये विसर्जन
- हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांची अशी विटंबना होणे, हे लज्जास्पद होय !
- परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारे हे रोखणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सातारा : श्रीक्षेत्र संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ ऐन शिवजयंतीच्या तोंडावर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, यासाठी काही समाजकंटकांकडून श्री गणेशमूर्तींची विटंबना करण्यात आली; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या जागृत धर्माभिमानी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने विटंबना झालेल्या मूर्तींची विधवत पूजा आणि आरती करून त्यांचे कृष्णा नदीमध्ये विसर्जन केले.
याविषयी अधिक माहिती अशी की,
१. संगम माहुली पुलाजवळच काही समाजकंटकांनी श्री गणेशमूर्तींची तोडफोड करून पूलावरून सहज जाता-येता दिसू शकतील, अशा अवस्थेत सोडून दिल्या होत्या.
२. श्रीक्षेत्र माहुली येथील हिंदु जनजागृती समितीच्या काही कार्यकर्त्यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी संगमनगर दूरक्षेत्राशी संपर्क करून त्यांना घटनेची माहीती दिली. या घटनेची तातडीने नोंद घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
३. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार करून घटनेची माहिती दिली आणि अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची विनंती केली; मात्र पोलिसांनी याविषयी असमर्थता दर्शवली. (अन्य पंथियांशी संदर्भात एखादी घटना घडली की, पोलीस स्वतःहून तत्परतेने निरपराध हिंदूंच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतात, हा आजवरचा सर्वत्रच्या हिंदूंना अनुभव येतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना प्रसंगाचे गांभीर्य सांगून भंग पावलेल्या मूर्ती नदीमध्ये विसर्जित करण्यासाठी विनंती केली. विटंबना झोलेल्या मूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडे साहाय्य मागितले. त्यानुसार समितीचे ८ कार्यकर्ते आणि २ पोलीस यांनी मिळून अस्ताव्यस्त टाकलेल्या, भंग पावलेल्या, फोडून-तोडून झाडी-झुडपात लपवून ठेवलेल्या मूर्तींचे नदीमध्ये विधीवत विसर्जन केले.
पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक !
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी घटनास्थळी भेट दिली. कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते नि:स्वार्थीपणे करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच ‘नेहमीच समितीचे सहकार्य लाभावे’, अशी विनंती केली. (हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत प्रत्येक वेळी राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य निःस्वार्थी वृत्तीने करत सरकार अन् पोलीस यांना साहाय्य होईल, अशीच कृती केली आहे. असे असतांनाही या कार्याला काही ठिकाणी पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून आडकाठी आणली जाते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
टीप : हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून विटंबना कशाप्रकारे करण्यात आली आहे, हे समजण्यासाठी प्रसिद्ध करत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात