उरण (जिल्हा रायगड) : आज काही संघटना छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात जातीवादाच्या नावाने फूट पडण्याचे काम करत आहेत. अशा संघटनांपासून सर्व हिंदूंनी सावध झाले पाहिजे, असे आवाहन शिवव्याख्याते श्री. सचिन करडे यांनी केले. येथील गोवठणे गावामध्ये सह्याद्री शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि युद्धनीती’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. सदरचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष वर्तक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
श्री. करडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनेकांना ठाऊक नसलेल्या युद्धनीतीची माहिती करून दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनीही मार्गदर्शन केले. श्री. सुर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपल्या कृतीत आणले पाहिजेत आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.
क्षणचित्रे
१. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. सूरज म्हात्रे उपस्थित होते.
२. धर्मप्रेमी श्री. पंकज शाह यांचा सत्कार करण्यात आला, तसेच गावातील महिलांना शौर्य माता पुरस्कार आणि मंडळांनाही पुरस्कार देण्यात आले.
३. कार्यक्रमाची सांगता ‘वन्दे मातरम’नेे करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात