पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्र स्थापन होणे, ही काळाची आवश्यकता आहे. वर्ष २०२३ मध्ये ईश्वराच्या संकल्पाने हे हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र त्यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे घडायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. कोंढणपूरजवळील अवसरेवाडी येथे दिनांकानुसार शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. श्री. जोशी यांच्या व्याख्यानानंतर श्री. विठ्ठल पडवळ आणि श्री. वामन झरांडे यांनी उपस्थितांना गावात प्रत्येक रविवारी रात्री ८ वाजता होणार्या धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन स्वभाषाभिमान जोपासा ! – श्री. पराग गोखले
कात्रजजवळील येवलेवाडी येथेही हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी मार्गदर्शन करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन स्वभाषाभिमान जोपासण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांना असलेली मोगल नावे पालटून त्यांचे हिंदु संस्कृतीनुसार नामकरण केले. संभाजी महाराजांना संस्कृत भाषेचे शिक्षण दिले. अष्टप्रधान मंडळामध्येही मराठी उपाध्या दिल्या. आपणही इंग्रजीचे स्तोम न माजवता मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे. औरंगाबाद, उस्मानाबाद याऐवजी संभाजीनगर, धाराशिव असा नामोल्लेख केला पाहिजे.’ या वेळी २५० जण उपस्थित होते.
व्याख्यानानंतर गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. पराग गोखले आणि तेथील पदाधिकारी यांनी शिवरायांच्या मूर्तीला पुरंदर गडाहून आणलेल्या ज्योतीने ओवाळून जोरदार घोषणा दिल्या. श्री. दत्ताभाऊ पोकळे आणि कांचन सोसायटीतील पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात