Menu Close

कोपरगाव येथील अवैध पशूवधगृहांचे प्रकरण : पशूवधगृहे ८ दिवसांत हटवा अन्यथा परिणाम भोगा ! – संतप्त नागरिक

कोपरगाव येथे बंद आणि नागरिकांचा मूकमोर्चा

कोपरगाव (जिल्हा नगर) : शहरात चालू असलेल्या अवैध पशूवधगृहांच्या निषेधार्थ आणि  प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या उत्स्फूर्त मूकमोर्च्याला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या मूकमोर्च्या समवेत शहरात स्वयंस्फूर्तीने बंदही पाळण्यात आला होता. नगर येथील गुन्हे अन्वेषण खात्याने महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील ४ पशूवधगृहांवर धाडी टाकून शेकडो जीवंत गायी, सहस्रो किलो गोमांस, सहस्रो जनावरांची कातडी, चरबी, चरबीपासून बनवलेले तेल, हत्यारे, टेम्पो- ट्रकसह इतर विविध साहित्य जप्त केले होते. त्या विरोधात शहरात संतापाची लाट उसळली होती. यामुळे २१ फेब्रुवारीला कोपरगाव शहरात बंद पाळून एक मूकमोर्चा काढण्यात आला होती. या वेळी स्थानिक पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांना मोर्चा झाल्यानंतर निवेदन देण्यात आले.

१. नगराध्यक्ष श्री. विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली हा मूकमोर्चा काढण्यात आला होता.

२. मूकमोर्च्यात सहभागी नागरिकांनी काळ्या फिती लावल्या होत्या, तर मोर्च्याच्या अग्रभागी गायीचे वासरू होते.

३. शहरात चालू असलेली अवैध पशूवधगृहे ८ दिवसांत हटवा; अन्यथा त्याचे परिणाम भोगा, अशी चेतावणी या वेळी मोर्चेकर्‍यांनी दिली. या मूकमोर्च्यात शिवसेना, मनसे, भाजप, बजरंग दल, गोरक्षण दल आणि इतर विविध पक्ष अन् संघटना आणि समस्त नागरीक सहभागी झाले होते.

४. आंबेडकर पुतळा येथून चालू झालेल्या मोर्च्याचे रूपांतर शेवटी सभेत झाले. या वेळी विविध नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

५. नगराध्यक्ष श्री. विजय वहाडणे म्हणाले की, पशूवधगृहांच्या सूत्रधारांकडून पोलीस, महसूल खाते, बाजार समितीला नियमित हप्ते मिळतात; त्यामुळे यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. म्हणूनच चक्क जिल्ह्याच्या ठिकाणावरील पोलिसांना कारवाई करावी लागली. या अवैध पशूवधगृहांवर कारवाई करावी अशी मागणी आणि सूचना आपण मुख्याधिकार्‍यांना केली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (नगराध्यक्षांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांवरही कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

६. पू. शिवानंदगिरी महाराज म्हणाले की, कोपरगावची भूमी ही ऋषीमुनींची भूमी आहे. ज्या गायींची आज रक्षण करण्याची आवश्यकता आहे, आज तिचीच राजरोसपणे हत्या होत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जी माणसे गायीला गोमाता आणि भूमीला माता मानत नाही, त्यांना या भूमीत रहाण्याचा कोणताही अधिकार नाही.

७. या धाडीनंतर काही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून आता केवळ त्यांनाच नव्हे, तर मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनाही निलंबित करण्याची मागणी नगरसेविका सपना मोरे आणि शिवाजी ठाकरे यांनी केली.

८. या वेळी कोपरगाव शहर कडेकोट बंद राहून शेकडो नागरिकांनी मूकमोर्च्यात सहभाग घेऊन शासनाला लवकरात लवकर सर्वांवर कारवाई करण्याची चेतावणी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *