चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
चोपडा (जळगाव) : काश्मीरमधील जमावाला पांगवण्यासाठी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात २ दगडफेक करणार्या देशद्रोह्यांचा मृत्यू झाला म्हणून देशाच्या सीमेवर दिवसरात्र लढणार्या सैनिकांवर गुन्हा नोंदवणे, ही घटना देशद्रोह्यांना प्रोत्साहन देणारी आणि सैन्याचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. काश्मीरमध्ये सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे सुधाकर चौधरी यांनी २० फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी केली.
चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करून तहसीलदार दीपक गिरासे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अपमान तसेच देशभक्त चंदन गुप्ता यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी ठोस कारवाई करून सूत्रधारांना त्वरित अटक करावी, देशविरोधी घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करावा, केंद्रशासनाने मदरशांतून केल्या जाणार्या देशविरोधी कारवायांचीसुद्धा चौकशी करावी, चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, या मागण्या करण्यात आल्या.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक श्री. संदीप पाटील, कार्यकर्ते सर्वश्री लक्ष्मण शेटे, मुरलीधर पाटील, चेतन बिर्हाडे, शशीकांत सोनवणे, शिवसेनेचे सर्वश्री प्रविन जैन, दीपक महाजन, ‘दैनिक सनातन प्रभात’चे वाचक श्री. नरेंद्र जैन, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात