-
सभेला साहाय्य करणार्या धर्मप्रेमींवर सभेला अनुपस्थित रहाण्यासाठी दबाव
-
प्रमुख हिंदुत्वनिष्ठांनाही सभेला साहाय्य न करण्याविषयी केले दूरभाष
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका राज्यात नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला स्वतःला एक हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या संघटनेकडूनच विरोध झाला. या संघटनेच्या लोकांनी सभेच्या आजूबाजूच्या परिसरात सभेच्या विरोधात प्रचार केला.
१. या सभेच्या प्रचाराच्या वेळी एका बैठकीत समितीचे कार्यकर्ते हस्तपत्रक वितरित करत असतांना तेथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा कार्यकर्ता म्हणाला, ‘‘या भागात आमची संघटना काम करत आहे, तर वेगळ्या संघटनेची आवश्यकता काय आहे ? सभेकरिता २० ते २५ सहस्र रुपये व्यय येईल, तो अनाथालयाला देऊ शकता. सभा करून काय लाभ होणार आहे ?’’ असे सांगून त्याने तेथील लोकांच्या मनात विकल्प निर्माण केला. (हिंदूंची दारूण स्थिती होण्यास अशा संघटना उत्तरदायी आहेत, असे कोणी म्हटल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. एका धर्मप्रेमीने समितीच्या कार्यकर्त्याला सांगितले की, या संघटनेने त्या परिसरात गावांतील सर्व धर्मप्रेमींना दूरभाष करून सांगितले की, हिंदु जनजागृती समितीच्या सभेला जायचे नाही.
धर्मप्रेमीने सांगितले, ‘‘सभेला येण्यासाठी आम्ही ६० जण सिद्ध होतो; परंतु संघटनेचा दूरभाष आल्यावर ३० जणांनी सभेला येण्यास नकार दिला.’’ (ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वासाठी झटणारी हिंदु जनजागृती समिती आणि तिची सभा आपली वाटत नाही, त्या संघटनेला सर्वसामान्य हिंदूंविषयी किती कळवळा असेल ? कधी नव्हे एवढी हिंदूऐक्याची आवश्यकता असतांना हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या संघटनेने उचललेले पाऊल हे अशोभनीयच म्हणावे लागेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. हिंदु धर्मजागृती सभेला पूर्वीपासून दायित्व घेऊन साहाय्य करणार्या एका अधिवक्त्यांना त्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या प्रमुखांनी दूरभाष केला आणि सांगितले, ‘‘या संस्थेत (हिंदु जनजागृती समितीत) काही लोक काँग्रेसचे आहेत. हे लोक पद्धतशीरपणे भाजपची मानहानी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही यांना साहाय्य करू नका. सभेच्या दोन दिवसांपूर्वी आणि त्यानंतरही पुन्हा एकदा त्यांना धर्मजागृती सभेला साहाय्य न करण्याविषयी दूरभाष करण्यात आला होता.
४. धर्मजागृती सभेला एक महिला वक्त्या येणार होत्या. त्यांना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या लोकांनी दूरभाष करून सांगितले, ‘‘तुम्ही एका शासकीय शाळेत शिक्षिका आहात. या संस्थेच्या (सनातन संस्थेच्या) कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट आहेत. ते अतिशय प्रक्षोभक बोलतात. तुम्हाला अडचण होऊ शकते. याचा तुम्ही विचार करा.’’ असे सांगून त्यांना सभेला उपस्थित न रहाण्याविषयी सांगितले.
५. काही हिंदुत्वनिष्ठ हिंदु धर्मजागृती सभेच्या कार्यात पुढाकार घेऊन सहकार्य करत होते. त्यांनी प्रारंभी हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेऊन सभेची माहिती दिली होती. त्या हिंदुत्वनिष्ठांनीही सभेच्या ४ दिवसांपूर्वीपासून हळूहळू सभेपासून लांब रहाणे पसंत केले. सभेला ते केवळ प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते.
६. एका धर्मप्रेमीने सांगितले की, त्यांना सभेला न जाण्यास सांगितले आहे. हे धर्मप्रेमी पूर्वी संबंधित संघटनेत कार्यरत होते. आता ते पतंजलि योग समितीशी जोडले गेले असून सध्या ते योग शिकवतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात