वाराणसी : येथील मोहनसरायस्थित ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड सायन्सेस’च्या वतीने १७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी ‘नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ परिवर्तनासाठी आवश्यक नेतृत्वाचे रसायन’ या विषयावर सहावी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘आध्यात्मिक नेतृत्व’ हा शोधप्रबंध सादर करण्यात आला. या शोधप्रबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले असून, सहलेखक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोधप्रबंध सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी सादर केला. या परिषदेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने आणि श्री सरस्वतीदेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या परिषदेत विविध देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांमधील तज्ञांनी शोधनिबंध सादर केले.
खरे नेतृत्व केवळ उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यानेच साध्य होते ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
‘आध्यात्मिक नेतृत्व’ या विषयावर शोधनिबंध सादर करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की,
१. ‘यथा राजा तथा प्रजा’, अशी एक उक्ती आहे. याचा अर्थ ‘जसा राजा असतो, तशी प्रजा असते’, असा आहे. वाईट नेत्यांमुळे समाजाची स्थितीही वाईट होते, हे आज सर्वच अनुभवत आहेत. त्याच न्यायानेे चांगल्या नेत्यांमुळे समाजाचे कल्याण साधले जाऊन तेथे शांती नांदते. खरे नेतृत्व केवळ उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यानेच साध्य होते.
२. आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या साहाय्याने याचा अभ्यास करण्याच्या हेतूने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. यात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या व्यक्तीमधील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा अन् त्याची प्रभावळ मोजणार्या उपकरणाद्वारे जगातील ४ प्रसिद्ध नेत्यांमधून प्रक्षेपित होणार्या आध्यात्मिक स्पंदनांचा अभ्यास करण्यात आला. या नेत्यांपैकी एक हुकूमशहा आहे, दुसरा प्रसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), तिसरा एका देशाचा राजकीय प्रमुख आणि चौथे उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत आहेत.
३. वरील चाचणीतील निरीक्षणांचे विश्लेषण करता लक्षात आले की, हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. हुकूमशहामधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे आपण समजू शकतो; परंतु एका प्रख्यात मुख्य कार्यकारी अधिकार्यांमधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असणे आश्चर्यकारक वाटते. पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारे संत वगळता अन्य तिघांमध्येही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. प्रभावळीच्या निरीक्षणातही संतांचीच प्रभावळ सर्वाधिक असल्याचे आढळले.
४. उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष निघाले असले, तरीही सूक्ष्मातील स्पंदनांचा खरा अभ्यास आणि विश्लेषण सूक्ष्म परीक्षणातूनच करता येते. असे सूक्ष्म परीक्षण करण्याची क्षमता असलेल्या साधकांनी या चारही नेत्यांचा अभ्यास केला असता हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे वाईट शक्तींच्या नियंत्रणात असलेले आढळले. राजकीय नेता वाईट शक्तींच्या नियंत्रणात नसला, तरी त्याच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव होता. संतांमधील सकारात्मकता मात्र एवढी होती की, ती त्यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणे तर परतवून लावू शकत होतीच, तसेच ती विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशीही एकरूपता साधू शकत होती.
५. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यासाठी सतत प्रयत्नरत असणे, विचार आणि कृती अधिकाधिक आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक बनवणारी संस्कृती अन् धर्माधिष्ठित निर्णयप्रक्रिया, चांगली आध्यात्मिक पातळी ही आमच्या आश्रमांतील नेतृत्वातील मुख्य सूत्रे आहेत.
६. आमच्या आश्रमांतील प्रतिकृतीवरून (मॉडेलवरून) हे स्पष्ट होते की, आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्ती आदर्श नागरिक बनेल. यातील काही आदर्श नागरिक आध्यात्मिक उन्नती करून आदर्श नेते बनतील. असे आदर्श नेते समाजामध्ये नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात