मुंबई : कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असणार्या प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात काही माजी विश्वस्तांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे नुकतेच उघड झाले आहे. भाविक जनतेने श्रद्धेने अर्पण केलेल्या निधीची लूट करणार्या या भ्रष्ट विघ्नासूरांच्या विरोधात जनजागृती व्हावी आणि शासनाने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने २५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. श्री सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेर राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला शेकडो भाविकांनी पाठिंबा देत मंदिरांतील भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मंदिराच्या बाहेर प्रबोधन करणारे हस्तफलक हातात धरून कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शनाला येणार्या भाविकांचे मंदिराच्या विश्वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी प्रबोधन केले आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले. यापूर्वीही श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचार उघड करणार्या निवृत्त न्यायमूर्ती टिपणीस समितीच्या सूचनांवर कार्यवाही व्हावी, भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी खटले प्रविष्ट व्हावेत, त्यांच्याकडून अपहार करण्यात आलेला देवनिधी व्याजासह वसूल करण्यात यावा आदी मागण्या असलेल्या निवेदनावर या वेळी शेकडो भाविकांनी स्वाक्षर्या केल्या.
श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मंदिरातील भ्रष्टाचार उघड केला. यामध्ये मंदिराच्या नियमांमध्ये दौर्याला अनुमती नसतांना अभ्यासदौर्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करून दौरे करणे, खोटी देयके जोडणे, नियम डावलून विविध संस्थांना लाखो रुपयांचा निधी देणे आदी मंदिरातील अपप्रकार उघड करण्यात आले होते. याविरोधात ठोस कृती व्हावी, यासाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली होती. आज जनजागृतीपर स्वाक्षरी मोहिमेद्वारे या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. यापुढे या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
भाविकांनी मंदिरात श्रद्धा आणि भक्तीभावाने अर्पण केलेल्या देवनिधीचा अपहार म्हणजे एकप्रकारे भाविकांच्या श्रद्धेवरच घाला आहे. त्यामुळे समस्त भाविकांनी, तसेच सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात