राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शनाद्वारे मागणी !
फोंडा : काश्मीरमध्ये सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्यावेत, कासगंज (उत्तरप्रदेश) येथे तिरंगा यात्रेवर दगडफेक करणारे आणि चंदन गुप्ता यांची हत्या करणारे यांच्यावर कारवाई करावी, तसेच मदरशांमधून देशविरोधी कारवाया केल्या जातात का ? याची सखोल चौकशी करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.
आंदोलनाला शंखनादाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले. शेवटी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी ठराव मांडले, तर आभारप्रदर्शन आणि सूत्रसंचालन श्री. शैलेश बेहरे यांनी केले.
राष्ट्रीय हिंदू आंदोलनातशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या
१. कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांना त्वरित अटक करावी, तसेच तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरावा. या हिंसाचारामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने उच्चस्तरीय समिती नेमावी. तिरंगा यात्रेत सहभागी असतांना हत्या झालेले चंदन गुप्ता यांच्या कुटुंबियांना आर्थिक, तसेच अन्य प्रकारचे आवश्यक ते साहाय्य शासनाने करावे.
२. देशात धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था असतांना मुसलमानांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरशांना अनुदान देणे शासनाने तात्काळ बंद करावे. सरकारी अनुदान लाटण्यासाठी बोगस मदरसे दाखवणार्यांवर कारवाई करावी. मदरशांतून देशविरोधी कारवाया केल्या जातात का, याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.
३. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सुरक्षादलांविषयी दाखवलेला अविश्वास पहाता जम्मू-काश्मीरचे रक्षण करण्यात त्या असमर्थ ठरल्या आहेत. त्यामुळे देशाच्या अखंडतेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी. भारतीय सैनिकांवर दगडफेक करणार्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार द्यावेत. सैनिकांवर प्रविष्ट केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.
हिंदुत्वनिष्ठ वक्त्यांचे मार्गदर्शन
आपले सैन्य अतिशय बलवान आहे; पण शासन कमकुवत आहे. शासन डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे झाल्याने आपली ही दुर्दैशा झाली आहे. – श्री. रमेश नाईक, माजी शिवसेनाप्रमुख, गोवा राज्य.
सैनिकांवर आक्रमणे होणे, ही एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे प्रकार त्वरित थांबवले पाहिजेत.- श्री. माधव विर्डीकर, अध्यक्ष, भारतीय संस्कृती रक्षा समिती
आंदोलनामध्ये सहभागी संघटना
भारतीय संस्कृती रक्षा समिती, मराठी राजभाषा समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती
आंदोलनाला संबोधित करणारे वक्ते
सर्वश्री रमेश नाईक, माजी शिवसेनाप्रमुख, गोवा राज्य; श्री. माधव विर्डीकर, अध्यक्ष, भारतीय संस्कृती रक्षा समिती आणि हिंदुप्रेमी अधिवक्ता गजानन नाईक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात