हिंदुत्ववाद्यांच्या कृतीशील संघटनास यश !
पिंपरी : येथील सांगवी भागात आयोजित करण्यात आलेले इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्पर आणि संघटित कृतीमुळे रहित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंती प्रबोधन व्याख्यानाच्या अंतर्गत सांगवी येथे २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वाजता कोकाटे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्रीमंत कोकाटे यांचा पूर्वेतिहास पहाता ते नेहमीच इतिहासाचा विपर्यास करून ब्राह्मण समाजावर गरळओक करतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मुसलमानप्रेमी होते, अशी प्रतिमा रंगवतात. (इतिहासाची मोडतोड करून विकृत इतिहास समाजापर्यंत पोहोचवणारे कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करणे, हे महानगरपालिकेतील संबंधित अधिकार्यांचे अज्ञान म्हणायचे कि इतिहासद्रोहाला असणारा राजाश्रय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
त्यामुळे सदर व्याख्यान रहित करण्यात यावे, यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ६ ठिकाणी निवेदने देण्यात आली. या वेळी विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान, केंद्राई गोशाळा, हिंदु जनजागृती समिती, अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती महोत्सव समिती, शिववंदना प्रतिष्ठान (डांगे चौक) आदी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
१. कार्यक्रमाची माहिती कळताच हिंदुत्ववाद्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवडच्या महापौर सौ. शकुंतला धराडे यांना निवेदन दिले. नंतर संपर्क केल्यावर त्यांनी व्याख्यान रहित करण्याच्या संदर्भात आयुक्तांना पत्र पाठवल्याचे सांगितले.
२. महापालिका आयुक्त श्री. राजीव जाधव यांनाही कार्यक्रम रहित होण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदनातील मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
३. परिमंडळ ३ चे पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली आणि सांगवी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
४. पिंपळे गुरव येथे भाजपचे आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. श्री. जगताप यांनी तत्परतेने संबंधितांना भ्रमणभाष करून सांगितले, हा कार्यक्रम रहित करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांकडून निवेदने देण्यात येत आहेत. कोकाटे यांचे व्याख्यान रहित करून त्याऐवजी अन्य वक्त्याचे नियोजन करावे.
५. पुण्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले, कायद्याच्या चौकटीमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही सदर व्याख्यान रहित करण्यासाठी बोलू शकत नाही.
तथापि व्याख्यानाचे परिणाम चुकीचे झाले, तर मात्र आम्ही व्याख्याते आणि आयोजक यांच्यावर खटला प्रविष्ट करू. (विखारी भाषण केल्यानंतर गुन्हा प्रविष्ट करतो, असे म्हणण्यापेक्षा कोकाटे यांचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन विखारी भाषण करण्याची इतिहासद्रोही कोकाटे यांना संधीच मिळू नये, यासाठी प्रयत्न केले, तर त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून होणारी जनतेची संभाव्य दिशाभूल टळेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विविध ठिकाणी निवेदने देतांना अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती महोत्सव समितीचे श्री. अभिजित शिंदे, श्री. कुणाल साठे, डांगे चौक येथील शिववंदना प्रतिष्ठानचे श्री. संजय शेळके, श्री शिवप्रतिष्ठानचे दत्ता गव्हाणे, विश्व हिंदु परिषदचे श्री. धनाजी शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दिलीप शेटे, संदेश कदम, रघुनाथ ढोबळे, रूपेश कामठे आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात