जलाशयाचे पाणी दूषित होण्याला आतातरी आळा बसेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी होणारे अपप्रकार थांबावण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री राजेंद्र मुठे, पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीमागील पंधरा वर्षे, धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ हा उपक्रम राबवत असून पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात प्रबोधन करत असल्याचे सांगितल्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी समिती राबवत असलेल्या मोहिमेचे कौतुक केले. त्या वेळी त्यांनी सांगितलेली सूत्रे खालीलप्रमाणे,
१. समितीच्या निरपेक्षपणे केलेल्या या सेवेची नोंद प्रशासन नक्कीच घेईल.
२. खडकवासला जलाशय रक्षण उपक्रमात समिती समवेत तहसीलदार, संबंधित प्रशासकीय अधिकारी, अभियंता, पोलीस अधिकारी यांना सहभागी करून घेऊन आणि त्या दिवशी योग्य ती उपाययोजना करण्याची सूचना देण्यात येईल.
३. खडकवासला जलाशयाचे पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचनाही महानगरपालिकेला देऊ.
४. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे अशा प्रकारचे आवाहनही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात