मुंबई : अनेक हिंदु देवस्थाने अलीकडे सरकारच्या वतीने ट्रस्ट स्थापन करून त्यांच्या हाती देण्यात आली आहेत. या देशामध्ये किती मशिदी, किती चर्च सरकारने कह्यात घेतली आहेत ? कुणाचे पैसे सरकारकडे जमा होत आहेत ? हिंदु धर्मावर मात्र असे अतिक्रमण करणे चूक आहे. वस्तूतः देवस्थानला भाविकांनी दिलेला पैसा हा देव आणि धर्म यांच्याच कार्यासाठी असतो, तो अन्य कुठल्याही कामासाठी वापरता कामा नये. सरकारी योजनांसाठी देवस्थानने पैसे देणे अभिप्रेतच नाही. सरकारी कामासाठी मंदिरातील पैसा खर्च करणे, ही मंदिरातील धनाची लूट होय, असे स्पष्ट मत भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी केले. श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास समितीच्या माजी विश्वस्तांनी भाविकांनी अर्पण केलेल्या पैशामध्ये केलेला अपहार श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने नुकताच उघड केला. यावर प्रतिक्रिया देतांना ते बोलत होते.
या वेळी भारताचार्य प्रा. शेवडे म्हणाले,
१. सिद्धिविनायक देवस्थानच्या माजी विश्वस्त मंडळींनी अभ्यासदौर्याच्या नावाखाली विमानाने प्रवास केला, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले आणि त्या ठिकाणी एकप्रकारे मौजमजा करून देव-धर्म यांचा पैसा उधळला. या गोष्टी अत्यंत निंद्य आहेत.
२. काही मंदिरांमध्ये लोकांनी देणगी दिलेली भूमी, सोने-नाणे या वस्तू हडप केल्या गेलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान किंवा तुळजाभवानी मंदिर देवस्थान, पंढरपूरचे देवस्थान अशा अनेक देवस्थानाची ही प्रातिनिधिक एकंदरीत विटंबना आहे.
३. हिंदु देवस्थानाच्या न्यासामध्ये देव-धर्म याविषयी काहीही अभ्यास नसलेले लोक नेमणे, हीच मुळामध्ये हिंदु धर्माची आणि हिंदु धर्मियांची अत्यंत फसवणूक आहे. अशा लोकांनी मंदिरात पूजा कशी व्हावी, मंदिरातील उत्सव कसे व्हावेत, मंदिराची व्यवस्था कशी व्हावी, मंदिराच्या पैशाचा सदुउपयोग त्या मंदिराच्या आणि धर्माच्या कार्यासाठी कसा करता येईल, या विषयीचा कोणताही विचार या मंडळींमध्ये नसतो. त्यामुळे सध्या आपण असे पहातोय की कित्येक देवस्थाने त्या पैशाचा दुरुपयोग करत आहेत.
४. वेदपाठशाळा चालवणे, आपले प्राचीन धर्मग्रंथ प्रकाशित करणे, त्याची भाषांतरे छापून प्रकाशित करणे, जिज्ञासूंना सुलभ भाषेत आणि स्वस्त दरात धर्माचे ज्ञान देणारे ग्रंथ उपलब्ध होतील, याची व्यवस्था करणे, तरुणांना धर्मप्रसारक म्हणून शिक्षण देणे, त्यासाठी खर्च करणे अशा विविध मार्गानी देवस्थानला धर्मासाठी खर्च करता येण्यासारखा आहे.
५. यासाठी हिंदूसंघटन हे अत्यंत आद्य कर्तव्य आहे आणि यातूनच आज ना उद्या आम्हाला हिंदु राष्ट्र निर्माण करायचे आहे; मात्र हिंदु राष्ट्र हा शब्द आला कि लगेच जातीयवाद आमच्या डोक्यात येतो.
सनातन प्रभात आणि सनातन संस्था उत्तम रितीने काम करत आहे
जगात ५८ मुस्लिम, ११० ख्रिश्चन, ६० बौद्ध राष्ट्रे आहेत, तर १ हिंदुस्थान असून आपण त्याला हिंदु राष्ट्र न बनवल्याने धर्मशाळा बनले आहे. आज जर आपण यावर विचार करून उपाय काढला नाही, तर हिंदु धर्माचा अंत स्वत:च्या डोळ्यासमोर पाहण्याचा प्रसंग येणार आहे. यावर उपाय एकच आहे, हिंदूंनी जागृत होणे आणि हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी एक होणे. यासाठी सनातन प्रभात आणि सनातन संस्था उत्तम रीतीने काम करत आहे. त्यांचे कार्य वाढवावे आणि त्यांना हिंदूंनी सहकार्य द्यावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात