Menu Close

भारतच आम्हाला साहाय्य करू शकतो ! – इराकमधील यझिदी लोकांचा साहाय्यासाठी टाहो

इस्लामिक स्टेटच्या भयंकर अत्याचारांशी यझिदींची एकाकी लढत

‘आम्ही एकाकी लढत आहोत. आम्हाला तुम्हा हिंदूंकडून, भारताकडून साहाय्याची अपेक्षा आहे’ , असे इराकमधील यझिदी या आदिवासी जमातीचा नेता मिर्झा इस्माईल पोटतिडकीने सांगत होता. मुंबईजवळ उत्तन येथे नुकतीच तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ या संस्थेची ६ वी परिषद पार पडली. तिथेच मध्यमवयीन मिर्झांशी झालेल्या गप्पांतून उलगडला हिंदूंशी कमालीचे साम्य असलेल्या इराकमधील यझिदी जमातीच्या एकाकी संघर्षाचा पट !

इराकच्या सिंजार क्षेत्रात डोंगरदर्‍यांच्या आड जीवन व्यतीत करणार्‍या यझिदी महिला आणि मुले (संदर्भ : पासब्ल्यू हे अमेरिकी संकेतस्थळ)

१. आतंकवाद्यांचे शहरांत सहकुटुंब उघडउघड वास्तव्य !

मिर्झासह दोन तरुणी होत्या. अवघ्या पंधरा वर्षांची असतांना इसिसने पळवून नेलेली निहाद आणि इसिसने पळवून नेलेल्या स्वत:च्या अल्पवयीन बहिणींच्या सुटकेसाठी धडपडणारी हनिफा ! आणखीही काही यझिदी कार्यकर्ते समवेत होते. या दोघीही कशाबशा इसिसच्या तावडीतून सुटका करून घेऊन पळून आलेल्या. त्यांची कहाणी संवेदना थिजवणारी होती. त्यांनी वर्णन केलेला इराक आणि सिरिया देशांतील इसिस आणि कुर्दीश अतिरेक्यांचा धुमाकूळ रक्त गोठवणारा होता. त्या अतिरेक्यांना होत असलेले अमेरिकेचे साहाय्य बुद्धीच्या पलीकडलीच ! आपल्या कल्पनेप्रमाणे हे इसिसचे आतंकवादी जंगलात इत्यादी नव्हे; तर गावांमध्ये आणि शहरांमध्ये वस्ती करून रहात आहेत. त्यांनी स्वत:चे कुटुंब बनवले आहे. काही जणांची कुटुंबेच त्यांच्यासह आली आहेत.

जिहादी इसिसपासून रक्षण होण्यासाठी आंदोलन करणार्‍या असाहाय्य यझिदी महिला (संदर्भ : असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्था)

२. इस्लाम न स्वीकारल्यामुळे सहस्रो यझिदींचा शिरच्छेद; शेकडो मुली पळवल्या !

ऑगस्ट २०१४ मध्ये यझिदी लोकांच्या डोंगराजवळच्या गावातून निहाद पळवली गेली, तेव्हा ती अवघी पंधरा वर्षांची होती. तिच्यासह जवळपास सातशे यझिदी मुली पळवल्या गेल्या. यांच्या उर्वरित कुटुंबांना ‘इस्लाम स्वीकार करा अन्यथा शिरच्छेद करू’, अशी धमकी दिली गेली. ‘अल्पवयीन मुलांना गुलाम म्हणून आणि मुलींना लैंगिक गुलाम म्हणून इसिसने पळवले होते. फारच अल्पवयीन मुलांना शस्त्रे चालवायला शिकवून त्यांना इसिसच्या सैन्यात सैनिक म्हणून लढायला भाग पाडले गेले. अन्य कुटुंबियांना इस्लाम स्वीकारत नसल्याने शिरच्छेद करून मारून टाकले गेले. काही सहस्र यझिदी लोकांचा इसिसने खात्मा केला आहे’, असे निहादने सांगितले.

३. आतंकवाद्यांच्या नृशंस अत्याचारांचा सामना करूनही धैर्याने तेथून पळून येणारी १५ वर्षीय निहाद !

३ अ. मुसलमानेतर मुलींवर सामूहिक बलात्कार करण्याची कुराणची आज्ञा असल्याचे सांगून १५ वर्षीय मुलीवर पाशवी अत्याचार ! : निहादला इतर अनेक मुलींसह मोसूल जवळच्या केंडी भागातील एका गावात आणले गेले. तिच्या लहान बहिणीला आधी सौदीतील इसिसकडे आणि नंतर इराकी इसिसकडे सोपवले गेले. त्यांनी तिला हिताई नावाच्या भागात नेल्याचे निहादला कळले. १५ वर्षांच्या निहादने पळून जाण्याचा अनेकवार प्रयत्न केला. ‘मी लहान आहे, मला जाऊ द्यावे, अशी अनेकवार विनंती केली’; मात्र तिच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत तिच्यावर सामूहिक बलात्कार होतच राहिले. शेवटी तिने जीव वाचवण्यासाठी ‘किमान सामूहिक बलात्कार तरी करू नका’, अशीही विनंती केली. इसिसच्या क्रूर अतिरेक्यांनी ‘तू मुसलमानेतर असल्याने तुझ्यावर सामूहिक अत्याचार करण्याचीच कुराणची आज्ञा आहे’, असे सांगत तिच्यावरील सामूहिक अत्याचार चालूच ठेवले.

३ आ. सततच्या बलात्कारांमुळे अपत्याला जन्म देणे : ती वेळ मिळेल, तेव्हा एका सज्जन शेजार्‍याच्या साहाय्याने तिच्या कुटुंबाशी दूरभाष अथवा भ्रमणभाषवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करतच होती. निहादला या काळात अनेक गावांत वेगवेगळे इसिसचे गट आणि त्यांचे कुटुंब यांच्याकडे विकले गेले. त्यातील इराकी गटाने तिला कुराण वाचण्यास भाग पाडले. बलात्कार तर नित्याचेच होते. त्यातून तिला दिवस गेले आणि तिने एका मुलाला जन्मही दिला. पंधरा महिन्यांनंतर त्या बाळाला तिथेच टाकून तिने एका शेजार्‍याच्या साहाय्याने पळ काढला. त्याआधी तिने पळून जाण्याचा प्रयत्न दोन वेळा केला होता. पकडली गेली. त्याची शिक्षा म्हणून तिच्यावर अधिक अत्याचार करण्यात आले.

३ इ. शेजार्‍यांच्या साहाय्याने इसिसच्या कह्यातून बाहेर पडून कुटुंबियांकडे परतणे : अखेर एकदा घरात कोणी नसतांना ती शेजार्‍यांकडे गेली. त्यांचा दूरभाष वापरून तिने वडिलांशी संपर्क साधला. नंतर त्या शेजार्‍याने तिला स्वत:च्या गाडीत लपवून चौक्या पहारे पार करून जवळच्या दुसर्‍या गावात पोहोचवले. तिथून लपत-छपत कधी पायी, तर कधी कुठल्या वाहनात लपून तिने प्रवास केला आणि काही दिवसांनी वडिलांकडे पोहोचली. आता तिने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला असून ती नववीत आहे. तिच्यापेक्षा लहान असलेल्या तिच्या बहिणीला इसिसने पळवून सिरियात नेले होते. निहादनंतर तीन महिन्यांनी तीदेखील सिरियातून पळून येण्यात यशस्वी झाली. तिच्या तीन भावांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. हे वाचलेले यझिदी उत्तर इराकमध्ये शेंगेई पर्वतरांगांच्या आश्रयाने रहात आहेत.

निहाद म्हणते, ‘‘आम्हाला कोणी वाली नाही. इराकी, त्यांचे शत्रू असलेले कुर्द, पलीकडचे सिरियातील मुसलमान, ख्रिस्ती आणि अमेरिकन सैन्य सगळेच आमचे लचके तोडायला टपलेले आहेत. आम्हाला आंतरराष्ट्रीय शांतीसेनेचे संरक्षण हवे. त्यासाठी ‘भारताने पुढाकार घ्यावा.’’

४. इसिसच्या आतंकवाद्यांनी केलेले भयंकर अत्याचार जवळून अनुभवणारी आणि चतुराईने त्यांच्या तावडीतून निसटलेली हनिफा !

४ अ. इसिसने आक्रमण करून मुलींना कह्यात घेऊन मारहाण करणे : ऑगस्ट २०१४ मध्ये कटनिया या गावातून पळवल्या गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय हनिफाची कथाही अशीच भयंकर आहे. या यझिदी गावावर इसिसने आक्रमण केले आणि शेकडो लोकांना कह्यात घेतले. त्यात जवळजवळ ६० तरुणी आणि अल्पवयीन मुली होत्या. त्यांना एका मोठ्या घरात एकत्र करण्यात आले. तिथे त्यांची विविध इसिस गटांत वाटणी करण्यात आली. त्या वेळी हनिफा एका फर्निचरच्या खाली लपून राहिली. तिथे प्रकाश कमी होता. तिला सर्व खोली आणि पलीकडची खोलीही दिसत होती. अनेक मुलींना मारहाण करण्यात आली. त्यात हनिफाच्या तीन लहान बहिणीदेखील होत्या. त्यातील एकीचे वय अवघे नऊ होते. एकीचे १५ आणि तिसरी १८ वर्षांची होती.

४ आ. कुराण वाचण्यास नकार देणार्‍या मुली आणि इस्लाम स्वीकारण्यास नकार देणारे पुरुष यांची जागेवर हत्या ! : त्यांच्यापैकी ज्या मुलींनी कुराण वाचण्यास नकार दिला, त्यांची तिथेच हत्या करण्यात आली. त्याच घराबाहेर या यझिदी कुटुंबातील पुरुष आणि मुले यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. ज्यांनी नकार दिला, त्यांचे तिथेच शिरच्छेद करण्यात आले. जी मुले सुंदर आणि मजबूत बांध्याची होती, त्यांना गुलाम म्हणून विविध इसिस गटांच्या कह्यात देण्यात आले. त्यात हनिफाचे तीन भाऊ होते. इसिसने सर्व मुलींना तेथून हलवल्यानंतरही हनिफा रात्री ११ वाजेपर्यंत त्या घरात लपून राहिली. रात्रीच्या अंधारात तिने पर्वताच्या दिशेने जाण्यास आरंभ केला.

४ इ. इसिसच्या अत्याचारांना बळी पडलेल्या यझिदींचे करूणामय चित्र जवळून अनुभवणे : त्या प्रवासात तिने अनेक भयानक दृश्ये पहिली. एका ठिकाणी एक यझिदी महिला गोळ्यांच्या जखमांनी मरून पडली होती. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिल्याचे दिसत होते. भुकेलेले ते बाळ त्या मृतप्राय आईचे स्तन चोखत दूध पिण्याचा प्रयत्न करत होते. काळीज पिळवटणारे ते दृश्य होते; पण मन कठोर करून हनिफा पुढे निघाली. त्या बाळाला सोबत घेतले असते, तर त्याच्या वेळी-अवेळी रडण्याने पकडले जाण्याची भीती तिला वाटली.

पुढे जात असता थकून ती एका बंद पडलेल्या गाडीच्या आडोशाला थांबली. बराच वेळ ती तिथे पडून राहिली. अशीच पडून असतांना तिला तहान लागली. तेव्हा जवळ पाण्याची बाटली मिळते का, हे पहाण्यासाठी तिने हाताने चाचपणी केली, तर कसलातरी मऊ थंड स्पर्श झाला. तिने अंधारात डोळे ताणून पाहिले, तर त्या अंधारात दोन उघडे डोळे निष्प्राण तिला दिसले. ती दचकून मागे सरली. अंधारात बराच काळ पाहिल्यावर ती दोन यझिदी माणसे शिरच्छेद करून तिथे टाकलेली आहेत, असे तिला दिसले. त्यांचीच ती गाडी असावी. कसाबसा धीर एकवटून ती तिथून पुढे निघाली.

४ ई. लहान मुलीवर झालेले अत्याचार ऐकून पित्याचा जागेवर मृत्यू : सतत तीन दिवस लपतछपत चालत हनिफा शेवटी त्या पर्वतावर पोहोचली. तिथे बरेच यझिदी आधीच पोहोचले होते. तिचे दोन भाऊ आणि आई-वडीलही तिथे पोहोचले होते; मात्र बहिणींचा पत्ता नव्हता. दुसर्‍या दिवशी तिच्या सर्वांत लहान बहिणीचा फोन आला. तिने वडिलांना तिच्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली. आपण पळून येण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले; मात्र मुलीवर झालेल्या अत्याचारांच्या त्या कहाणीने त्या पित्याला जागेवरच फोनवर बोलतांनाच हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला; मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी भावंडांत सर्वांत मोठ्या असलेल्या हनिफाकडून सर्व बहिणींना वाचवण्याचे आणि सर्व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे वचन घेतले.

४ उ. वारंवार होणार्‍या इसिसच्या आक्रमणांना कंटाळून जर्मनीत स्थलांतर : हनिफाच्या दोन्ही बहिणी इसिसच्या कह्यातून पळून येण्यात यशस्वी झाल्या. मात्र त्यातील सर्वांत छोट्या बहिणीला काही महिन्यांपूर्वी पुन्हा पळवले गेले आहे. त्यानंतर मात्र हनिफाने आपल्या सर्व कुटुंबाला (आई, दोन भाऊ, दोन बहिणी यांना) लपूनछपून जर्मनीत हलवले आहे. हनिफा एकटीच इतर यझिदी लोकांच्या साहाय्याने आपल्या पळवून नेलेल्या बहिणीच्या सुटकेसाठी सर्व प्रयत्न करत आहे. इसिसने तिच्या बहिणीच्या सुटकेसाठी काही सहस्र डॉलर रक्कम मागितली आहे. सर्व संपत्ती आधीच इसिसने कह्यात घेतल्याने या कुटुंबाकडे रक्कम नाही.

५. कुर्द आणि इसिसच्या आतंकवाद्यांनी घरे काढून घेतल्यामुळे डोंगरदर्‍यांत रहाण्याची वेळ

मिर्झांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत जवळजवळ दहा सहस्र यझिदींची कत्तल झाली आहे. साडेसात सहस्र तरुण यझिदी मुली इसिसच्या कह्यात आहेत. कुर्दिस्तान भागात सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत यझिदी लोकांना मतपत्रिकेवर नाव आणि मोबाईल नंबर लिहिणे अनिवार्य केले होते. त्याआधारे शोधून शोधून काही लोकांचे शिरच्छेद करण्यात आले. कुर्द आणि इराकी वंशाच्या इसिस अतिरेक्यांनी घरे काढून घेतल्याने सहस्रो यझिदी लोकांना रस्त्यावर रहाण्याची वेळ आली आहे. सुरक्षिततेसाठी अनेकांनी डोंगरदर्‍यांचा आसरा घेतला आहे. इराकमध्ये आता केवळ १२ लाख यझिदी उरले आहेत.

६. भारतात माणुसकी अजूनही टिकून असल्यामुळे यझिदींच्या भारताकडून अपेक्षा !

हनिफा सांगते, ‘‘माझी बहीण एकटी नाही. अशा सहस्रो यझिदी मुली आज इसिसच्या अत्याचारांना तोंड देत आहेत. एका अवघ्या सात वर्षांच्या यझिदी मुलीचे लग्न इसिसच्या अतिरेक्याशी जबरदस्तीने लावून दिल्याचे उदाहरण आपण समोर पाहिले आहे. अनेक मुले इसिसचे गुलाम म्हणून राबवली जात आहेत. ‘आम्हाला भारतासारख्या देशाकडूनच साहाय्य मिळेल; कारण माणुसकी केवळ याच देशात शिल्लक आहे’, असे आम्हाला वाटते.’’ यझिदी लोकांच्या या शिष्टमंडळाचे नेते मिर्झा इस्माईल यांनी सांगितले की, त्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन संयुक्त राष्ट्रात यझिदी लोकांची बाजू मांडण्यासाठी साहाय्य मागितले आहे. सुषमा स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यझिदींचे हे शिष्टमंडळ सुखावले आहे. ‘आम्हाला केवळ हिंदू आणि ज्यू लोकांनीच थोडे साहाय्य केले आहे’, असे मिर्झा म्हणतात. श्री श्री रवीशंकर यांनी त्यांना केलेल्या साहाय्याविषयी ते गौरवोद्गार काढतात.

७. अमेरिका, ब्रिटन आणि युरोप इसिसला साहाय्य करत असल्याचा आरोप

मिर्झा पुढे म्हणतात, ‘‘केवळ सद्दामनेच आम्हाला पाठिंबा दिला होता. आजवरच्या इतिहासात यझिदींना तब्बल ७४ नरसंहारांना (‘जिनोसाईड्स’ना) सामोरे जावे लागले आहे. आता कुर्द, अमेरिका, इराकी, सिरियन सगळे मिळून आमचे लचके तोडत आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाकडे साहाय्य मागत आहोत; पण कोणी साहाय्याला येत नाही; कारण जग मुसलमान आणि ख्रिस्ती देशांत विभागले गेले आहे. ‘अमेरिका, ब्रिटन आणि युरोप इसिसला आमच्या विरोधात साहाय्य करत आहेत,’ असा थेट नि:संदिग्ध आरोप मिर्झा इस्माईल यांनी केला. ‘अमेरिकेच्या शस्त्रांच्या पेट्या चुकून नेहमी इसिसच्या भागात पडतात; पण आम्ही मागत असूनही कधीही आमच्या भागात चुकून शस्त्रांच्या पेट्या पडत नाहीत’, अशी धक्कादायक माहितीही ते देतात.

८. हिंदु संस्कृती आणि मराठी, हिंदी अन् संस्कृत या भाषांशी यझिदी भाषेचे साम्य

मोरावर बसणार्‍या कार्तिकस्वामींच्या प्रतिमेशी साम्य असलेल्या देवतेची पूजा करणारी ही मंडळी जी भाषा बोलतात त्यात अनेक संस्कृत आणि हिंदी शब्द आहेत. सगळे आकडे तर एक, दोन, तीन, चार ते सहस्र वगैरे थेट मराठी-संस्कृत आहेत. त्यांच्यात शुभकार्याला वाढदिवसाला वगैरे शुभेच्छा देताना चक्क ‘हजार साल हुशी हो’ (खुशी हो) म्हणण्याचा प्रघात आहे. मंदिरात जातांना किंवा शुभकार्याच्या प्रसंगी पादत्राणे काढून ठेवण्याची प्रथा आहे. मंदिरात तुपाचा दिवा लावण्याची आणि पंचमहाभूतांचे पूजन करण्याची पद्धत आहे. ते पृथ्वीला माता मानतात. परस्परांना हात जोडून अभिवादन करण्याचीही पद्धत आहे.

अनेक प्रथा-परंपरा जुळत असल्याने त्यांना भारत आपला वाटतो; म्हणूनच ‘या आतंकवादविरोधी लढाईत भारत हा एकमेव देश त्यांच्यासह उभा राहील’, याची त्यांना निश्‍चिती आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *