चेन्नई : कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते. जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती हे गेल्या काही मासांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. गेल्या मासात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. अशातच २८ फेब्रुवारीला त्यांना श्वासोच्छ्वासाचाही त्रास होऊन त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कांचीपुरम् पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य म्हणून वर्ष १९९४ मध्ये विराजमान
कांची कामकोटी पीठाची स्थापना अद्वैत सिद्धांताचे जनक आदि शंकराचार्य यांनी ख्रिस्ताब्द ४८२ मध्ये केल्याचे सांगण्यात येते. जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ या दिवशी तमिळनाडू येथे झाला होता. जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी वर्ष १९५४ मध्ये जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना कांचीपुरम् पीठाचे उत्तराधिकारी उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते.
पुढे जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या देहत्यागानंतर वर्ष १९९४ मध्ये जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती शंकराचार्यपदी विराजमान झाले.
त्यांनी कांचीपुरम् मठाद्वारे अनेक शाळा आणि नेत्र रुग्णालये चालू केली. जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी जयेंद्र सरस्वती यांनी जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे.
…अन् शंकराचार्य जयेंद्र सरस्वती हिंदुद्वेषी षड्यंत्राच्या अग्नीदिव्यातून यशस्वीपणे बाहेर पडले !
कांचीपुरम् येथील वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन् यांच्या हत्येच्या प्रकरणी तत्कालीन जयललिता सरकारने शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना नोव्हेंबर २००४ मधील ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला अटक केली. या विरोधात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पुणे येथे तात्काळ मोर्चा काढला होता. त्यापाठोपाठ देशभरातील असंख्य हिंदुत्वनिष्ठांनीही मोर्चा काढून सरकारप्रती रोष प्रकट केला. त्यानंतर त्यांना २ मास कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे निधर्मी नेते तोंडघाशी पडले आणि न्यायालयाने नोव्हेंबर २०१३ मध्ये शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
अनुकरणीय सेवा आणि उदात्त विचार यांद्वारे जगद्गुरु शंकराचार्य जयेंद्र सरस्वती सदैव स्मरणात रहातील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
कांची कामकोटी पीठाचे आचार्य जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे. अनुकरणीय सेवा आणि उदात्त विचार यांद्वारे त्यांचे अस्तित्व लाखो भाविकांचे मन अन् हृदय यांत कायम असेल.
वृत्तवाहिन्यांसाठी जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यापेक्षा अभिनेत्री श्रीदेवी महत्त्वाच्या !
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव २७ फेब्रुवारीला दुबईहून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी भारतात ‘बातमी देण्याजोग्या दुसर्या घटनाच घडल्या नाहीत’, अशा आविर्भावात श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोण-कोणत्या नट-नट्या, राजकारणी उपस्थित होते, हेच दाखवण्यात धन्यता मानली. त्याच वेळी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या देहत्यागाविषयी मात्र केवळ २ ते ४ मिनिटांचे वृत्त अधून-मधून दाखवण्यात येत होते.
जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे, हीच त्यांना खरी भाववंदना ठरेल ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था
(फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी, २८ फेब्रुवारी २०१८)
वंदनीय,
जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वतीजी,
(जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे उत्तराधिकारी) कांची कामकोटी पीठ, यांच्या चरणी सादर प्रणाम !
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना आज सिद्धावस्था प्राप्त झाल्याचे वृत्त समजले. शंकराचार्यांचे आजपासून शरीररूपात अस्तित्व जरी नसले, तरी त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान यांच्या माध्यमातून अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी ते सतत कार्यरत रहातील. उच्च कोटीच्या संतांनी देहत्याग केला, तरी सूक्ष्म रूपातून ते कार्यरत असतात. त्यामुळे लौकिकार्थाने शंकराचार्य आपल्यासोबत देहाने नसले, तरी त्यांच्या सूक्ष्म रूपातील अस्तित्वाची अनुभूती भाविकांना येत राहील. अर्थात त्यांच्या देहधारी अस्तित्वाचा आनंद यापुढे घेता येणार नाही, याची खंत आहेच.
शंकराचार्यांकडून सनातनला धर्मकार्य करण्याची ऊर्जा मिळाली !
जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती आणि सनातन संस्था यांच्यामधील स्नेह फार जुना आहे. शंकराचार्यांना सनातन संस्था आणि साधक यांच्याविषयी अनन्य ममत्व होते. या प्रेमापोटीच त्यांनी वर्ष २००३ मध्ये सनातन आश्रम, फोंडा (गोवा) येथील आणि वर्ष २००५ मध्ये सनातन आश्रम, देवद, पनवेल (रायगड, महाराष्ट्र) येथील आश्रमाला भेट देऊन सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले होते.
धर्मजागृतीचा कोणताही उपक्रम घेऊन सनातनच्या साधकांनी स्वामीजींकडे जावे आणि त्यांनी त्या उपक्रमाला भरभरून आशीर्वाद द्यावेत, असा हा ऋणानुबंध मागील १५ वर्षांपासून चालू होता. स्वामीजींनी सनातनला पितृवत स्नेह दिला आणि त्यातून धर्मकार्य करण्याची ऊर्जा आम्हाला मिळत राहिली.
स्वामीजींनी हिंदु धर्मरक्षण आणि हिंदुहित यांसाठी केलेले अव्याहत कार्य म्हणजे हिंदु समाजावर केलेले अनंत उपकार आहेत. केवळ शब्दांच्या माध्यमातून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे उचित होणार नाही. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार धर्माचरण करून प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला ईश्वराशी जोडण्यासाठी कार्यरत रहाणे, हीच त्यांच्या चरणी खरी भाववंदना ठरेल !
आपला नम्र,
डॉ. जयंत बाळाजी आठवले,
संस्थापक, सनातन संस्था,
रामनाथी, फोंडा-गोवा.
जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ऋणानुबंध
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार
१. ‘सनातनचे कार्य खूप चांगले आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी प्रबोधन करत आहेत. यांच्या आश्रमात सूक्ष्मातील उपायांविषयीही प्रबोधन केले जाते.’ (१७ फेब्रुवारी २००६)
२. ‘सुक्ष्मजगत प्रदर्शनाविषयी देहली येथे झालेल्या सभेत त्यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक युगात देवासुर युद्ध होत असते. या युगात ‘सनातन संस्था’ ते सुक्ष्मातील युद्ध लढत आहे.’’ (१७ फेब्रुवारी २००६)
३. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी १४ नोव्हेंबर २०११ या दिवशी चेन्नई येथे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, ‘‘समितीचे कार्य खूपच चांगले आहे.’’
४. ‘डिसेंबर २०११ मध्ये मुंबईतील मुलुंड येथील एका कार्यक्रमात जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती होती. त्या कार्यक्रमाला सनातनचे साधकही आले आले असल्याचे समजल्यावर त्यांना फार आनंद झाला. त्यांनी ‘‘प.पू. डॉ. आठवले यांना मी ओळखतो. त्यांचे कार्य मला माहिती आहे’’, असे गौरवोद्गार काढले.
५. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोवा येथील द्वितीय ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनी ‘हिंदूंमध्ये जागृती होऊन ते संघटित व्हावेत, हीच प्रार्थना !’, असे आशीर्वाद दिले होते. (२५ मे २०१३)
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्यास कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे आशीर्वाद
कांचीपुरम् (तमिळनाडू) : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ५ फेब्रुवारी २०१८ या दिवशी जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जगद्गुरु शंकराचार्यांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्याविषयी अवगत केले. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे कार्य ऐकल्यावर जगद्गुरु शंकराचार्यांनी आनंद व्यक्त केला आणि कार्यासाठी आशीर्वाद दिले. या वेळी जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना तमिळ भाषेतील सात्त्विक ‘पंचांग’ भेट देण्यात आले. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत श्री. विनायक शानभाग हेही उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वति यांच्या देहत्यागाने हिंदु समाजावरील कृपाछत्र हरपले ! – सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वति यांनी आज सकाळी देहत्याग केला. शंकराचार्यांच्या देहत्यागामुळे हिंदु समाजावरील कृपाछत्र हरपले आहे. आजवर हिंदु समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हिंदु जनजागृती समिती त्यांच्या प्रती कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करत आहे, अशी श्रद्धांजली हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक तथा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यक्त केली आहे.
हिंदु समाजाच्या उद्धारासाठी शंकराचार्यांनी अखंड भारतभ्रमण केले; वेदपारायण, गोसंवर्धन, अन्नदान, वृद्धाश्रम आदी विविध कार्ये अविरत केली; धर्मशास्त्राच्या संदर्भात मार्गदर्शन करून हिंदु समाजाला वेळोवेळी दिशा दिली, याबद्दल त्यांचे हिंदु समाजावर अनंत उपकार आहेत. ज्याची परतफेड होणे, केवळ अशक्य आहे ! हिंदु जनजागृती समितीच्या कार्यावर जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वति यांचे विशेष प्रेम होते. वर्ष २००३ मध्ये शंकराचार्यपदी पीठारोहणाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फोंडा, गोवा येथे ‘जाहीर सभे’चे आयोजन केले होते. या सभेला शंकराचार्य आवर्जून उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधातील आंदोलन असो वा मंदिर सरकारीकरण कायद्याच्या विरोधातील आंदोलन असो, अशा अनेक आंदोलनांना आणि उपक्रमांना शंकराचार्यांचे आशीर्वाद होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’ला त्यांनी प्रतीवर्षी आशीर्वादपर पत्र आणि संदेश पाठवत असत. तसेच हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, या हेतुने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रस्तुत करण्यात आलेली ‘धार्मिक कृत्योंका शास्त्र’ ही मालिका दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध ‘श्री शंकरा’ या वाहिनीवर चालवण्यासाठी शंकराचार्यांनी साहाय्य केले होते. त्यामुळे हिंदु समाजाला धर्मशिक्षित करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हीच खरी शंकराचार्यांना श्रद्धाजंली ठरेल आणि त्यासाठी हिंदु जनजागृती समिती अखंड प्रयत्नरत राहिल !