‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूसंघटन करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली आहे. ती म्हणजे कॅथलिक ख्रिस्ती तरुणाशी हिंदु मुलीचे ‘प्रेमविवाह’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कसाल या गावांमध्ये याचे प्रमाण पुष्कळ जाणवले. एका गावात एक हिंदु मुलगी ख्रिस्ती मुलासह विवाह करून त्याच्या घरी गेली, तर तिला घरच्या लोकांकडून विरोध होण्याऐवजी त्यांनी स्वत:हून ‘देवक’ घेऊन तिच्या सासरी पोहोचवण्याचा अचाट प्रकार घडला आहे. जणूकाही तिच्या सासरी तिला श्री अन्नपूर्णादेवीचे पूजन करू देणार आहेत !
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढते धर्मांतर
जिल्ह्यात ‘प्रोटेस्टंट’ ख्रिस्ती हे प्रार्थनासभा अथवा कोणाला रिक्शा किंवा ‘डंपर’ वाहन घेण्यासाठी पैसे देऊन त्यांचे धर्मांतर करत आहेत. दुसरीकडे ‘कॅथलिक’ ख्रिस्ती हे हिंदूंच्या मुलींना पलायन करून घेऊन जातात. मालवणमध्ये एका ख्रिस्ती कुटुंबातील तीनही भावांनी हिंदु मुलींशी लग्न केली आहेत. यात ‘चर्चकडून प्रोत्साहन मिळत असेल’, असा संशय येण्यास वाव आहे; कारण ख्रिस्ती पंथ विस्तारवादी आहे आणि या सहस्रकात संपूर्ण आशिया खंड ख्रिस्तमय करण्याचे ध्येय पोपने त्यांना दिले आहे.
२. धर्मांतर हे राष्ट्रांतर !
हे सर्व उघडउघड चालू असतांना इतर हिंदूंचे रक्त सळसळत नाही, हे दुःख आहे. एक मुलगी ख्रिस्ती झाली की, तिची संतती म्हणजेच पुढची पिढीही ख्रिस्ती झाली, हे हिंदूंना कधी समजणार ? ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे’, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. ज्यांचे मूळ विदेशांत, ज्यांची भाषा विदेशी, अशांना भारत भूमीविषयी प्रेम का वाटावे ? याचे मोठे उदाहरण म्हणजे गोव्यातील ख्रिस्ती नागरिकांनी घेतलेले ‘पोर्तुगीज नागरिकत्व’!
३. सध्याची शिक्षणपद्धती, सामाजिक माध्यमे आणि चित्रपटसृष्टी, हे धर्मांतरास कारणीभूत असणे
हिंदु युवती ख्रिस्ती युवकांकडे आकर्षित होण्यामागे आजची शिक्षणपद्धती, सामाजिक माध्यमे (सोशल मीडिया) आणि चित्रपटसृष्टी, या ३ गोष्टींचा सहभाग आहे, असे वाटते. आर्थिक पारतंत्र्यात गेलेल्या आपल्या देशात पाश्चात्त्य आस्थापनांच्या प्रभावाखाली जाणीवपूर्वक इतिहास आणि इतर शालेय वाङ्मय यांमध्ये पाश्चात्त्य संस्कृतीचा मनावर कसा प्रभाव पडेल, हे पाहिले जाते. चित्रपटसृष्टीत एक हिंदु मुलगी चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती युवकाशी लग्न करते, हे तर सर्रास दाखवले जाते. सिनेमातील ‘पाद्री’ हा धीरगंभीर आणि तत्त्वनिष्ठ असतोच असतो; पण ‘भटजी’ हे एक विनोदी पात्र अन् चेष्टेचा विषय असलेले दाखवण्यात येते. थोडक्यात हिंदु युवती पाश्चात्त्य ‘ग्लॅमर’ला बळी पडते.
४. धर्मशिक्षणाच्या अभावी धर्मांतर !
आज ख्रिस्ती किंवा मुसलमान मुलगी ही त्यांच्या पंथाच्या नियमांचे चोख पालन करतांना दिसते. बुरख्याविना मुसलमान आणि गळ्यात रोझरी अन् हातावर गोंदवलेल्या क्रॉसविना ख्रिस्ती युवती दिसणे जेवढे दुरापास्त, तेवढेच कुंकू लावलेली हिंदु तरुणी दिसणेही दुरापास्तच आहे. छोट्या-मोठ्या शहरांत आता मंगळसूत्रही ‘आऊट ऑफ फॅशन’ झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अन्य पंथियांना धर्मशिक्षण मिळत असल्याने त्यांचा धर्माभिमान जागृत आहे आणि म्हणून ते धर्माचरण करत आहेत. याउलट हिंदु मुलींना ना शाळेत धर्म शिकवत, ना घरी, ना मंदिरात ! धर्मशिक्षण नाही म्हणूनच हिंदु युवतींना धर्माभिमान कसा असणार ? त्यामुळेच हिंदु युवती सहज धर्मबाह्य विवाह करण्यास सिद्ध होते; पण अन्य पंथीय तसे करतांना दिसत नाहीत.
५. गावातील प्रत्येक वाडीवर धर्मशिक्षणवर्ग आवश्यक !
हे सर्व थांबण्यासाठी आज गावातील प्रत्येक वाडीवर धर्मशिक्षणवर्ग आवश्यक आहे. मंदिरातून उत्सवाच्या दिवशी डबलबारी आणि ‘रेकॉर्ड डान्स’ऐवजी हिंदूंमधील धर्मतेज जागृत करणारी प्रवचने होणे आवश्यक आहे. गावातील सर्व हिंदूंनी संघटितपणे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ख्रिस्ती धर्मांतर याला बळी कशी पडणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे अन्यथा येणारा काळ हिंदूंसाठी खडतर असणार, हे निश्चित !’
– डॉ. संजय प्र. सामंत, पिंगुळी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात