Menu Close

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या पुढाकाराने ‘एक मुंबई-एक शिवज्योत’

सातारा येथे शिवतीर्थ, पोवईनाका येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या पुढाकाराने ‘एक मुंबई-एक शिवज्योत’ अशी एकत्रित अभिनवरित्या शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे शिवप्रेमींनी शिवतीर्थावर पूजन केले. या ठिकाणी विविध संघटना आणि स्थानिक मंडळांच्या शिवप्रेमींनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला आणि उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती साजरी केली. धारकर्‍यांनी किल्ले शिवनेरीवरून एका दिवसात दौडत शिवज्योत शिवतीर्थावर आणली. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी शिवसेनेचे उपशाखाप्रमुख श्री. नीरज भोसले यांनी शिवज्योत आणि भगवाध्वज यांचे पूजन केले. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी ध्वजाला पुष्पहार अर्पण केला.

या कार्यक्रमात पारंपरिक वेशात शिवप्रेमी महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

मुंबई, ठाणे, रायगड येथे २३ ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

मुंबई जिल्ह्यात विविध मंडळे, संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये मुंबई येथे १३, ठाणे आणि रायगड येथे प्रत्येकी ५, अशा २३ ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये काही ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत होण्यासाठी उपस्थितांना आवाहन करणारे मार्गदर्शन केले. भांडुप (प.) येथील गावदेवी मित्रमंडळ, विक्रोळी पार्कसाईड येथील श्री सुराज्य प्रतिष्ठान, घाटकोपर येथील श्री जगदंब ग्रुप आणि गोळीबार रोड येथील मोरे चाळ, नालासोपारा (पूर्व) येथील संयुक्तनगर आणि नालासोपारा (पश्‍चिम) येथील समेळपाडा येथील शिवसेनेच्या शाखांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. रायगड जिल्ह्यामध्ये आवरा, वशेणी (तालुका उरण) तळजामजकूर, कोल्हार, फणस, डोंगरी, पेण, शिरके गाव पेण, सांगुर्ली (पनवेल) अशा ७ गावांत शिवजयंतीच्या निमित्ताने श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शिवतीर्थ पोवईनाका येथील शिवरायांच्या मूर्तीची विधीवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच यानिमित्त शिवतीर्थ परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्वांनी ध्येयमंत्र म्हणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केली. या वेळी समितीचे सर्वश्री मंगेश निकम, हेमंत सोनवणे, सुनील दळवी यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राजा शिवछत्रपती मंडळ, आंबेदरे (भोसलेवाडी) यांचे कार्यकर्ते, तसेच अंगापूर येथून आलेले शिवप्रेमी उपस्थित होते. नीलकमल फ्लॉवर मर्चंटचे श्री. करपे यांनी पुष्पहार उपलब्ध करून दिला.

अन्य जिल्ह्यांत साजरा करण्यात आलेला जयंतीउत्सव

पुणे : जिल्ह्यातही विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवात मार्गदर्शन करण्यात आले.

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीत शिवजयंती हा एक उत्सव म्हणून साजरा होतो. शहरातील शिवसेना विभागीय शाखेचे अनुमाने ५० चित्ररथ मिरवणुकीत पारंपरिक ढोलताशा पथकासह सहभागी झाले होते.

नाशिक : सायंकाळी हिंदु एकता आंदोलन पक्ष यांच्यासह अन्य पक्षांच्या वतीने एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक संकेतस्थळावरून तिथीनुसार शिवजयंतीचे महत्त्व काय आहे आणि तिथीनुसार शिवजयंती का साजरी करावी, अशा आशयाचे संदेश मोठ्या प्रमाणावर पाठवले जात होतेे.

संभाजीनगर : सकाळी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि ध्वजारोहण यांचा कार्यक्रम पार पडला. नंतर वाहनांची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुकीला संस्थान गणपती येथून आरंभ होऊन क्रांतीचौक येथे समारोप झाला.

पिंपरी येथील श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचा ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सव

पिंपरी : श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सव आयोजित करण्यात आला होता. २५ फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत शिवव्याख्यानमाला आयोजित करण्यात आली  होती. श्री शिवछत्रपतींची पालखी, तसेच १४ फूट उंचीच्या सिंहासनावर आरूढ शिवरायांच्या मूर्तीची पारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळ, घोडे, वारकरी पथक, बैलगाडा, पालखी, पोतराज, हलगी वादन, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये तत्कालीन मावळे आणि सरदार यांचे वंशज सहभागी झाले.

पुणे शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे : शहर आणि परिसरात आज तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढून हिंदुत्वाचा जागर करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. श्री शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने किल्ले शिवनेरी येथेही शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री शिवाई मंदिर ते शिवाजी महाराज जन्मस्थळ अशी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक काढण्यात आली. हातात मशाली, भगवे ध्वज, पोवाडे यांमुळे वातावरण भगवे झाले होते.

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण

मुंबई येथे विमानतळावर रायगड किल्ल्याची मोठी प्रतिकृती बनवण्यात आली होती. येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *