पुणे : शिवजयंती उत्सवाच्या औचित्याने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानांना शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१. भोलावडे (तालुका भोर) : येथील आझाद मित्र मंडळात हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. बोराटे म्हणाले, ‘‘युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी संघटित व्हायला हवे. प्रत्येक मावळ्याच्या जीवाचे मोल महाराजांना होते. युद्धात वीरमरण आलेल्या मावळ्यांच्या कुटुंबाचे दायित्व महाराज घेत होते, त्याच हिंदुस्थानात आज सैनिकांवर दगडफेक होते, हे हिंदुस्थानचे दुर्दैव आहे.’’ या वेळी व्याख्यानाला ५५० हून अधिक ग्रामस्थ पारंपरिक वेशात उपस्थित होते. केळवडे (तालुका भोर) येथे सौ. धनश्री शिंदे यांनी २५ धर्माभिमान्यांनी मार्गदर्शन केले.
२. नर्हेगाव (सिंहगड रस्ता) : वृंदावन सभागृह येथे रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या १०० धारकर्यांसमोर विषय मांडला. त्यानंतर धर्माभिमानी श्री. बापू सावले यांनी समितीच्या व्याख्यानांविषयी जागृती करून अन्य युवकांना सहभागी करून घेईन असे उत्स्फूर्तपणे सांगितले. या वेळी कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.
३. अंतुलेनगर (येवलेवाडी) : येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी १७ धर्माभिमान्यांसमोर विषय मांडला. या वेळी हिंदु राष्ट्रविषयी प्रतिज्ञा करून सर्व धार्मिक कृतींचे आचरण करणार, असे उपस्थित धर्माभिमान्यांनी सांगितले.
४. निगडे (ता. मावळ) : हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश जोशी यांनी ‘श्रद्धेच्या जोरावर आणि आई भवानीच्या आशीर्वादावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसे स्थापन केले’, याविषयी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. येथे २०० धर्माभिमान्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. काही युवकांनी गावात धर्मशिक्षण वर्गाची मागणी केली.
५. अंबी (तळेगाव दाभाडे) : संघर्ष मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन केले होते, यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ८० ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्रितरित्या हिंदु राष्ट्राची शपथ घेतली.
६. मुळशी : येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी विषय मांडला. याचा लाभ ४५ जणांनी घेतला. ‘धर्मकार्यात सहभागी होऊ’, असे उपस्थित धर्माभिमान्यांनी या वेळी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात