नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने बालिकेवरील अत्याचार आणि अश्लील पोस्टर प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदने
पोलिसांनी हिंदूंना आधार वाटेल, असे उत्तर देणे अपेक्षित आहे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? पोलिसांनी राष्ट्ररक्षणासह संस्कृतीरक्षणही करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बालिकेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याविषयी आणि नंदुरबार बाजारपेठेत लावण्यात येणार्या चित्रपटांचे अश्लील फलक लावण्याच्या विरोधात चित्रपटगृह चालकावर कारवाई करण्याविषयी नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांना हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने २ स्वतंत्र निवेदने देण्यात आली. त्या वेळी ‘चित्रपटांना परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) अनुमती देते’, असे उत्तर येथील पोलीस अधीक्षकांनी दिले.
दोंडाईचा येथील घटना अतिशय निंदनीय, संतापजनक आणि आरोपीची विकृत मानसिकता दर्शवणारी आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यासह राज्यभरातील महिलांनी निषेध मोर्चे काढले; परंतु तरीही शासन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असे दिसते. या निवेदनाद्वारे अत्याचार करणार्या नराधमाला ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा करावी, शहरासह राज्यातील महिला आणि मुली यांच्या संरक्षणात वाढ करावी, निर्भया पथकाची कार्यक्षमता वाढवावी, शाळा परिसरातील टवाळखोर तरुणांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, सदर प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात यावे, हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांची (वकिलांची) नियुक्ती करावी, अशा मागण्या पहिल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठेत महिलांची खरेदीच्या अनुषंगाने कायमस्वरूपी वर्दळ असते. अशा ठिकाणी नंदुरबार शहरातील चित्रपटगृह चालकाकडून जी पोस्टर लावली जातात, ती अतिशय अश्लील असून त्यांच्याकडे पाहून काही नराधमांच्या वासना उद्दिपीत होतात. त्यातूनच दोंडाईचासारखे प्रकार घडतात. या पोस्टरकडे पाहून महिलांना लज्जेने मान खाली घालावी लागते. यामुळे सभ्य महिलांना बाजारात खरेदीला जाणेही कठीण वाटते. अशा अश्लीलतेचे प्रदर्शन करणार्या चित्रपटगृहगृह चालकांवर योग्य ती कारवाई करावी आणि महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दुसर्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात