दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवण्याची मागणी अद्याप अपूर्णच
कधी नव्हे एवढी हिंदूऐक्याची आवश्यकता असतांना ब्राह्मणद्वेषातून विरोध करणार्यांकडून देश कधीतरी एकसंध ठेवला जाईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे महापालिकेच्या आवारात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कृतीला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर पुतळा बसवण्याचे महापालिकेकडून मिळालेले आश्वासन पूर्ण न झाल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने महापालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पूजनानंतर केवळ २ घंटे प्रतिमा तिथे ठेवून ब्राह्मण महासंघाकडून ती उचलण्यात येणार होती; मात्र संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेरीस अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. आनंद दवे यांनी ती प्रतिमा तेथून हालवली.
‘गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मण महासंघाच्या कार्यालयात दादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत होते. या वर्षी शासनाने केलेल्या आश्वासनांच्या पूर्तीची जाणीव करून देण्यासाठी उद्विग्नतेतून पालिकेत पूजन करण्यात आले’, असे श्री. आनंद दवे यांनी सांगितले. ब्रिगेडी संतोष शिंदे यांनी या संदर्भात उलटसुलट वक्तव्ये केली.
(म्हणे) ‘ब्राह्मण महासंघ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहे !’- संभाजी ब्रिगेड
या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ‘दादोजी कोंडदेवांची प्रतिमा त्वरित काढण्यात यावी’, असे म्हणत गोंधळ घातला. ‘ब्राह्मण महासंघ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहे. (तेढ कोण निर्माण करत होतेे, हे जनता जाणून आहे, तसेच दूरचित्रवाहिन्यांवरूनही जनतेने पाहिले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) महापौर मुक्ता टिळक यांचा यांना छुपा पाठिंबा आहे’, असेही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात