पुणे : प्रसारमाध्यमांनी श्रीदेवीच्या मृत्यूविषयी २४ घंटे वार्तांकन करण्यात धन्यता मानली; परंतु धर्मासाठी सर्वस्व अर्पिलेल्या शंकराचार्यांच्या देहत्यागाविषयी केवळ ४ ओळीत बातमी आटोपली. प्रसारमाध्यमांच्या या उदासीन भूमिकेला आजचा समाज उत्तरदायी आहे. तुम्हाला जे पहायचे आहे, तेच तुम्हाला दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमे टी.आर्.पी.चा खेळ करतात. बदलत्या समाजमनाचेच ते प्रतिबिंब आहे, असे परखड मत
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने डॉ. शेवडे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आणि त्यांनी लिहिलेल्या ‘… आणि सावरकर’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी आपल्या मार्मिक शैलीत सावरकरांविषयी समाजात असलेले अपसमज, क्रांतिकारकांविषयी समाजाची उदासीनता, सामाजिक माध्यमांचा विपर्यस्त वापर अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले. या कार्यक्रमाला पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अंकित काणे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शेवडे पुढे म्हणाले,
१. सावरकरांचे प्रखर हिंदुत्व, मराठी भाषेवरील त्यांचा अभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. ‘सावरकरांनी माफी मागितली’ असे सांगण्यात येते, ते ही खोटेच. सावरकरांची उडीही फसली, असे म्हणणे योग्य होणार नाही; कारण त्या उडीचे वार्तांकन १५० हून अधिक जागतिक कीर्तीच्या वर्तमानपत्रांनी केले होते !
२. सावरकरांना भारतरत्न का दिला नाही ? महाराष्ट्र शासनाला इंडिया हाऊस विकत घेण्याची बुद्धी का होत नाही ? ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणतांना ‘काँग्रेसयुक्त भाजप व्हायला नको’, असा विचार येतो. साहित्य संमेलनाध्यक्ष न्यूड, एस. दुर्गा या चित्रपटांविषयी सहानुभूती दाखवतांना ‘अन्य धर्मियांच्या प्रेरणास्थानांसंबंधी चित्रपट काढा, असे आवाहन करतील का ?’ केवळ हिंदु देवतांविषयीच विरुद्ध भूमिका का घेतली जाते?
३. आज मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा प्रघात वाढत आहे. जे ज्या संस्कृतीत असते, तेच भाषेतूनही पुढे येते. इंग्रजी भाषेत ‘पाप’ याला ‘सिन’ असे म्हणतात. ज्यांना मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषा श्रेयस्कर वाटते, त्यांनी मला ‘पुण्य’, ‘पतिव्रता’ यांसारख्या अनेक शब्दांचे इंग्रजी शब्द दाखवा. मुलांना ‘रामा ट्रायोलॉजी, कृष्णा ट्रायोलॉजी’ यांतून रामायण आणि महाभारत शिकवले जात आहे. पालकांनी एकदा स्वतः ती पुस्तके वाचावी आणि किती विकृत-विपर्यस्त लिखाण केले गेले आहे, ते पहावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात