एका शहरात एका संस्कृतीद्रोही कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलनाच्या वेळी एका पत्रकाराविषयी आलेला अनुभव
हिंदूसंघटन आणि संस्कृतीरक्षण यांच्या कार्यात अडथळे आणून हिंदूंमध्ये दूही पसरवू पहाणारे पत्रकार समाजाला दिशा काय देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
‘एका शहरात एका संस्कृतीद्रोही कार्यक्रमाच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली, तसेच आंदोलन करण्यात आले. त्या वेळी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराविषयी आलेला अनुभव येथे देत आहे.
संस्कृतीद्रोही कार्यक्रमाला विरोध करणार्या सनातन संस्थेवर टीका करणारा पत्रकार
एका शहरात नुकतेच एका संस्कृतीद्रोही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शासनाने अनुमती देऊ नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेनंतर एका दैनिकाच्या पत्रकाराने प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘मीही हिंदुत्वनिष्ठच आहे. ‘हा कार्यक्रम व्हायला नको’, असे मला वाटते; पण हिंदूंचेच म्हणजे तुमचेच सरकार असतांना तुम्ही (हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था) पत्रकार परिषद, आंदोलन इत्यादी कशाला करता ? तुमच्याच पक्षाला तुम्हाला सांगता येत नाही का ? याचा अर्थ सनातनवाले केवळ नाटकच करतात.’ (हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या दोन्ही संघटना राजकीय नाहीत किंवा त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, हेही माहिती नसणारे पत्रकार जनतेला दिशा काय देणार ? सध्या राज्यात असलेले सरकार कोणत्या पक्षाचे आहे आणि त्यांचे कोणत्या संघटनांशी संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना समिती आणि संस्था यांचा राजकीय संबंध जोडणे, हे चुकीचे आहे. यावरून पत्रकाराचा हिंदु जनजागृती समिती आणि सनातन यांच्या विषयीचा द्वेषच दिसूनयेतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
आंदोलनाच्या वेळी पत्रकाराने हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मनात हिंदु जनजागृती समितीविषयी नकारात्मक विचार घालण्याचा प्रयत्न करणे
यानंतर त्याच विषयाच्या संदर्भात आंदोलनाच्या वेळीही तो पत्रकार उपस्थित होता. आंदोलनाचे प्रसिद्धीपत्रक हिंदु जनजागृती समितीच्या ‘लेटरहेड’वर होते. त्यामुळे त्यांनी आंदोलनात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधीला ‘तुमचे प्रसिद्धीपत्रक कुठे आहे ? आंदोलन तुमचे असतांना ते त्यांचे (समितीचे) प्रसिद्धीपत्रक वाटत आहेत. तुमचे प्रसिद्धीपत्रक द्या. आम्ही तुमचीच नावे छापू’, असे सांगितले. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीने आंदोलनानंतर प्रसिद्धीपत्रकाची सेवा करणार्या कार्यकर्त्यांकडे नकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘आंदोलन आम्ही करायचे. आमचे ग्रामस्थ उपस्थित असतांना तुम्ही तुमच्या ‘लेटरहेड’वर कसे काय प्रसिद्धीपत्रक वाटले ? आमच्या ग्रामस्थांची नावेही त्यात घातली नाहीत. असे केल्यावर आम्हाला पुढच्या वेळी तुमच्यासह उपक्रम करायचे असल्यास विचार करावा लागेल.’’
त्या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाविषयीची कार्यपद्धत सांगितली. त्या लोकप्रतिनिधीला ही कार्यपद्धत कळल्यानंतर त्यांची नकारात्मक भूमिका अल्प झाली. नावांचा उल्लेख नसल्याविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी या लोकप्रतिनिधींची क्षमाही मागितली. ग्रामस्थ आणि समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिलेच आंदोलन होते.
पत्रकाराच्या मनात हिंदु जनजागृती समितीविषयी आकस असल्याचे लक्षात येणे
त्या पत्रकाराच्या मनात प्रारंभीपासूनच हिंदु जनजागृती समितीविषयी आकस होता. त्यातच त्याने ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांना उलटसुलट प्रश्न विचारून त्यांच्या मनात समितीविषयी नकारात्मक मत बनवण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्यक्षात समितीचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, हे त्या पत्रकाराला एक तर ठाऊक नसावे किंवा त्यांनी समितीविषयी हेतूपुरस्सर नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला असावा, असे वाटले.’
– एक कार्यकर्ता, हिंदु जनजागृती समिती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात