जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध ठिकाणी झालेल्या मार्गदर्शनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’, तसेच ‘साधना का महत्त्वाची आहे’, हे लक्षात आल्याचे सांगितले.
कोल्हापूर
१. कसबा सांगाव : येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ २०० जणांनी घेतला.
२. शिरोली : येथील उमा भवन येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांचे मार्गदर्शन, तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याचे आयोजन शिरोली ग्रामपंचायत आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्या माजी शिवसेना ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपाली अनिल खवरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी शिरोली येथील सरपंच श्री. शशिकांत खवरे, ग्रामविकास अधिकारी श्री. ए.एस्.कटारे, महिला बाल-कल्याण समिती उपाध्यक्षा सौ. उर्मिला जाधव यांसह ग्रामपंचायत सदस्य, शालेय विद्यार्थिनी अशा ५७० जणांची उपस्थिती होती.
कार्यक्रम झाल्यावर सौ. उर्मिला जाधव म्हणाल्या, ‘‘आजच्या काळात महिला आणि युवती यांच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अत्यावश्यकता आहे. असा कार्यक्रम लवकरच परत घेऊ.’’ कार्यक्रम झाल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विशेष
अ. ग्रामपंचायतीने महिला-मुली यांच्यासाठी ५०० सनातन-निर्मित कुंकवाच्या डब्या दिल्या.
आ. कार्यक्रमाचे सर्व नियोजन महिन्याभरापूर्वीच सौ. रूपाली खवरे यांनी केले होते, तसेच कुंकवाच्या डब्या देण्याविषयी त्यांनी पुढाकार घेतला होता. (महिला दिनाच्या निमित्ताने धर्मशिक्षण मिळण्यासाठी, तसेच महिला-युवती यांना प्रशिक्षण मिळण्यासाठी कार्यक्रम घेण्यात पुढाकार घेणार्या सौ. रूपाली खवरे यांचे आणि शिरोली ग्रामपंचायत या दोघांचेही अभिनंदन ! यातून आदर्श घेऊन अन्यत्रही अशाच कार्यक्रमांचे आयोजन करता येईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
३. नवे-पारगाव : येथील तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनासाठी १२५ विद्यार्थिनी, शिक्षक, तसेच कर्मचारी उपस्थित होते.
४. शिमनाकवाडी (इचलकरंजी) : येथील ग्रामपंचायीच्या वतीने सनातन संस्थेच्या सौ. सविता जाधव यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ १५० हून अधिक जणांनी घेतला.
सांगली जिल्हा
दिघंची आणि करगणी या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी सभापती सौ. जयमाला देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिघंची येथील कार्यक्रमास येथील उपसरपंच सौ. तेजश्री मोरे, म्हसवड (जिल्हा सातारा) येथील नगरसेविका सौ. हिंदमाला राजमाने आणि हिंदु जनजागृती प्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. सुनिता दीक्षित उपस्थित होत्या. दिघंची येथे ५० हून अधिक; तर करगणी येथे ३५० हून अधिक महिला उपस्थित होत्या.
या वेळी सौ. दीक्षित यांनी ‘‘सध्या महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतांना तिला प्रति ३२ व्या मिनिटाला बलात्काराला बळी पडावे लागते. त्यामुळे स्त्रीला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर सक्षम असणे आवश्यक असून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमास काही शिक्षिकाही उपस्थित होत्या, त्यांनी सौ. दीक्षित यांचा संपर्क क्रमांक घेतला आणि त्यांच्या शाळेतही मार्गदर्शन करण्याविषयी विचारणा केली.
२. कार्यक्रमाच्या आयोजकांनी ‘यापुढेही तुमचा कार्यक्रम ठेवू’, असे सांगितले.
३. सर्व महिलांनी विषय पुष्कळ आवडल्याचे सांगितले.
४. एक महिला म्हणाल्या, ‘‘मला या कार्यक्रमाविषयी दूरभाष आला नसता; तर एवढ्या सुंदर ज्ञानापासून मी वंचित राहिले असते.’’
मुंबई
धर्माचरणातच महिलांचे हित ! – सौ. प्राजक्ता सावंत, रणरागिणी शाखा, मुंबई.
मुलुंड (मुंबई) : सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार आणि महिलांवरील वाढते अत्याचार पहाता महिलांनी शारीरिक, मानसिक, तसेच अध्यात्मिक स्तरावर सक्षम होणे आवश्यक आहे, त्यासाठी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदींचा आदर्श ठेवून धर्माचरणी व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. प्राजक्ता सावंत यांनी केले. महिला दिनानिमित्त ८ मार्च या दिवशी मुलुंड येथील नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘धर्माचरण आणि साधना’ या विषयावर त्या बोलत होत्या. ‘धर्माचरण केल्याने आणि ईश्वराचे नामस्मरण केल्याने आपल्याला ईश्वराचे साहाय्य मिळते. महिलांनी स्वतः धर्माचरण करून पाल्यांना धर्मशिक्षण देऊन महिलांसाठी आदर्श हिंदु राष्ट्रासाठी संघटित होऊया’, असे त्या या वेळी म्हणाल्या. या वेळी १५० महिला उपस्थित होत्या.
त्यानंतर सौ. आशा गंगाधरे यांनी ‘प्रथमोपचार : काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कर्नाटक राज्यातही मार्गदर्शन
१. माणकापूर (कर्नाटक) : येथील मराठी मुलांच्या शाळेत ‘माता-पालक’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या सौ. अंजली कोटगी यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ ११७ माता-पालक, तर ६ ते ८ वीतील ३०० विद्यार्थी यांनी घेतला. या वेळी ‘एस्.डी.एम्.सी’च्या माजी अध्यक्षा सौ. जयश्री पुजारी यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून या मार्गदर्शनामुळे पालक आणि विद्यार्थी यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, असे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम्.आर्. कांबळे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून ‘हे कार्य निरपेक्षपणे होत आहे. समाज घडवण्यासाठी आणि आदर्श पिढी निर्माण होण्यासाठी या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे’, असे सांगितले. येथे सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. मार्गदर्शन आणि ग्रंथप्रदर्शन यांसाठी शाळेने चांगले सहकार्य केले.
२. निपाणी : येथे सौ. विजया मंगरूळकर यांनी जिजामाता महिला मंडळ येथे ‘स्त्री आणि तिचे कौटुंबिक जीवनातील स्थान’ या विषयावर मार्गदर्शन केले. विषय ऐकल्यावर महिलांनी नऊवारी साडी नेसणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात