मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
यासाठी खर्या भाविकांना मंदिरांतील सेवा करण्यासाठी नेमा ! हिंदु राष्ट्रात खरे भक्तच मंदिरात सेवा करतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथील श्री भवानीदेवीच्या प्रतिमेची विटंबना मंदिर संस्थानच्या स्वच्छता कर्मचार्यांकडूनच होत असल्याचे लक्षात आले आहे. २० फेब्रुवारी २०१८ या दिवशी मंदिर परिसरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमित कदम मंदिर परिसरात गेल्यावर त्यांना मंदिर संस्थानच्या (ठेकेदाराचा) स्वच्छता कर्मचारी स्वच्छता झाल्यावर कचर्याच्या डब्यातून देवीच्या प्रतिमा, परडी असे पूजेचे साहित्य कचर्यात टाकण्यासाठी घेऊन जातांना दिसला. तेव्हा त्याला ‘‘हे साहित्य कोठे घेऊन निघाला आहेस ?’’, असे विचारले असता त्याने ‘‘तुम्हाला काय करायचे’’, असे उद्धटपणे उत्तर दिले. तो पुढे गेल्यावर श्री. कदम यांनी तो हे सहित्य कोठे टाकतो हे पहाण्यासाठी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे त्या कर्मचार्याने कचराकुंडीत ते साहित्य न टाकता बाजूला नेऊन ठेवले. (देवीच्या प्रतिमा कचर्यात टाकणार्या आणि हे सर्व पहाणार्या हिंदूंनाही याविषयी काहीच वाटत नाही, हेच दुर्दैव. या प्रकाराचा तुळजापूर येथील हिंदूंनी सनदशीर मार्गाने विरोध करावा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
त्यानंतर श्री. कदम यांनी मंदिर समितीचे धार्मिक व्यवस्थापक श्री. दिलीप नाईकवाडी यांच्याशी संवाद साधला आणि ‘‘पाण्याच्या अभावामुळे देवीच्या प्रतिमा, परडी, पोत हे विसर्जन करता येत नसले, तरी त्यांचे मंदिराच्या मागील बाजूस अग्निविसर्जन करू शकतो’’, असे सुचवले. त्यानंतर नाईकवाडी म्हणाले, ‘‘अग्निविसर्जन केल्यास लोक प्रतिमा जाळल्या, असे म्हणतील.’’ त्यानंतर कदम यांनी ‘‘अग्निविसर्जनाला धर्मशास्त्राचा आधार आहे’’ असे संगितल्यावर नाईकवाडी यांनी ‘ठीक आहे’, असे ढोबळ उत्तर दिले. या वेळी श्री. कदम यांच्यासमवेत माजी नगरसेवक श्री. सुहास साळुंके आणि भाजपचे नेते श्री. बाळासाहेब शामराजे हेही उपस्थित होते.
श्री. अमित कदम यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केल्यानंतर येथील धर्मप्रेमी श्री. गौतम भिसे आणि श्री. सुरेश क्षीरसागर यांनी कचर्यातील देवीच्या प्रतिमा आणि परडी बाजूला काढून ठेवले, तसेच श्री. काकासाहेब शिंदे यांनी १ आठवड्यात मंदिराबाहेर निर्माल्य कलश ठेवण्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात