Menu Close

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

आझाद मैदानात एकवटलेल्या शेकडो भाविकांची जनआंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी

हिंदुत्वनिष्ठांना सरकारकडे अशी मागणी का करावी लागते ? भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? मंदिरांतील भ्रष्टाचारावर आळा बसण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार करणार्‍या राजकारण्यांनी देवालाही सोडलेले नाही. मंदिरात भ्रष्टाचार करून मंदिरांचे पावित्र्य भंग करणार्‍या भ्रष्ट विश्‍वस्तांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी संप्तत मागणी १३ मार्चला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात केली.

आझाद मैदानात आयोजित आंदोलनात योग वेदांत समिती, श्रीराम हिंदु सेना, जैन संघ पनवेल, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवकार्य प्रतिष्ठान-विक्रोळी, हिंदु राष्ट्र सेना, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, हिंदु गोवंश रक्षा समिती, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, हिंदु रक्षा सेना, श्री बजरंग सेवा दल, परशुराम सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले आणि आमदार श्री. राजन साळवी यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

या वेळी हातात फलक घेऊन मंदिर सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांतील शेकडो भाविकांनी या आंदोलनात सहभागी होऊन श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली. याविषयी समस्त भाविक आणि भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

स्वाक्षरीद्वारे अभियानाला भाविकांचा पाठिंबा

मागील १० दिवस ‘श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’ आणि भाविक यांनी मुंबई जिल्ह्यातील अंधेरी, दादर, घाटकोपर, भांडुप येथे; ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, ठाणे शहर; रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल आणि तळोजा, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, तर नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे आदी १२ ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवून माजी विश्‍वस्तांनी भ्रष्टाचाराविषयी जनजागृती केली. या स्वाक्षरी अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेत सहस्रावधी नागरिकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला.

असा झाला भ्रष्टाचार !

१. शासनाच्या अनुमतीविना मंदिराच्या निधीतून कोणत्याही स्वरूपाचे दौरे आयोजित करण्यात येऊ नयेत, अशी सूचना असतांना त्यांचे पालन न करता १ जानेवारी २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत या न्यासाच्या विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांविषयी अभ्यासदौर्‍याच्या नावाखाली ८ लाख ११ सहस्र २५९ रुपये आणि वाहकाला अधिकचा भत्ता म्हणून ४ लाख ८० सहस्र ४० रुपये असा एकूण १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपये इतका खर्च करण्यात आला. यामध्ये लॉजिंग, खानपान इत्यादी खर्चाचाही समावेश आहे.

२. गोविंदराव आदिक हे राज्याचे विधी आणि न्यायमंत्री, तर दिलीपराव सोपल हे राज्यमंत्री असतांना या दोघांच्या न्यासाला अनुक्रमे ५० लाख आणि २० लाख रुपये देणगी देण्यात आली. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या देणग्या विविध संस्थांना राजकीय लाभासाठी देण्यात आल्या आहेत.

३. वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्‍वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (जिल्हा सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा केला; मात्र प्रत्यक्षात त्यांनी दौर्‍याचे दिलेले एक देयक गोवा राज्यातील एका हॉटेलचे आहे. ते गोव्यात मौजमजा करण्यासाठी गेले होते का ?

४. २ ते ४ डिसेंबर २०१३ या कालावधीत तत्कालीन सर्व विश्‍वस्तांनी तिरुपती देवस्थानची पाहणी करण्यासाठी विमानाने दौरा केला. अन्य प्रवासमार्गांऐवजी विमानाने खर्चिक प्रवास करून विश्‍वस्तांनी मंदिराच्या पैशांची उधळपट्टी केली. या अभ्यासदौर्‍यासाठी विश्‍वस्त मंडळाने कोणत्याही प्रकारे शासनाची अनुमती घेतली नाही. या पाहणीचा अहवाल पहाता तो अत्यंत हास्यास्पद आहे.

आम्हाला तुमचा अभिमान आहे !

भरतशेठ गोगावले यांचे सनातनच्या साधकांविषयी गौरवोद्गार

तुम्ही धर्मासाठी काम करत आहात. धर्मासाठी तुम्ही जीवन वाहून घेतले आहे. सनातनच्या काही साधकांना कारावास भोगावा लागला; मात्र त्यांची निर्दोष मुक्तता झाली. सत्य हे उशिरा बाहेर येते; मात्र ते चिरकाळ टिकते. ज्या पद्धतीने तुम्ही चिकाटीने धर्मासाठी कार्य करत आहात, याविषयी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, अशा प्रकारे भरतशेठ गोगावले यांनी सनातनच्या साधकांविषयी गौरवोद्गार काढले.

मान्यवरांचे उद्बोधक विचार !

भ्रष्टाचार करणार्‍यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी ! – आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

श्री सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेल्या धनामध्ये काही माजी विश्‍वस्तांनी जो अपहार केला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी. ज्या लोकांनी मंदिरात भ्रष्टाचार केला तो उघड करण्याचे काम तुम्ही करत आहात. तत्कालीन शासनाला हा भ्रष्टाचार माहीत नव्हता का ? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आजही हिंदुत्वाचे कार्य करत आहोत. आम्हाला राजकारण करायचे नाही, तर देव, देश आणि धर्म टिकवायचा आहे. हिंदुत्वाचा एक सेवक म्हणून या कार्यासाठी मी तुमच्या सोबत आहे.

एक हिंदू म्हणून श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय विधानसभेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन ! – आमदार राजन साळवी, शिवसेना

श्री सिद्धीविनायक मंदिर हे महाराष्ट्रचे नव्हे, तर संपूर्ण विश्‍वातील हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. मी हिंदू आहे. आपण हिंदुत्वाचे कार्य करणारी मंडळी आहोत. शासनाने मंदिरामध्ये स्थापन केलेल्या ट्रस्टचा हेतू मंदिरात आलेल्या धनाचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा, यासाठी आहे; मात्र यापूर्वीच्या मंदिरातील ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी मंदिराच्या धनाचा अपहार केला आहे. आता राज्यात शिवसेना-भाजप यांचे शासन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा भ्रष्टाचार निपटून काढतील, याची मला खात्री आहे. मंदिरातील धनाचा अपहार करून भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना शासन निश्‍चितच शिक्षा करेल. मी एक हिंदू म्हणून विधानसभेत सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.

हिंदुत्वनिष्ठ समजल्या जाणार्‍या शासनाने मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना शासन करावे ! – ब्रिजेश शुक्ल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

ब्रिजेश शुक्ल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मशीद आणि मदरसा यांतील पैसा कधी हिंदूंना देण्यात येत नाही, तर हिंदूंच्या मंदिरांतील पैसा अन्य धर्मियांसाठी का द्यावा ? हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रात भ्रष्टाचार करणार्‍यांना प्रायाश्‍चित्त घ्यायला लावू.

मंदिरात लूट करणारे आधुनिक गझनी ! – मिलिंद पोशे, हिंदु जनजागृती समिती

मंदिरात भ्रष्टाचार होतो, या नावाखाली हिंदूंची मंदिरे शासनाने कह्यात घेतली आहेत; मात्र शासनाच्या कह्यात जाऊनही मंदिरात भ्रष्टाचार चालूच आहे. यापूर्वी आक्रमकांनी मंदिरे तोडली. मंदिरात लूट करणारे हे आधुनिक गझनी आहेत.

श्री सिद्धिविनायक मंदिर घोटाळा प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे ! – एन्.के. जमादार, प्रधान सचिव, विधी आणि न्याय विभाग

श्री सिद्धिविनायक मंदिर घोटाळा प्रकरणी ८ दिवसांपूर्वीच या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत, अशी माहिती विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव एन्.के. जमादार यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला १३ मार्चला दिली. या शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे होते.

मंदिरात माथा न टेकवणार्‍या अहिंदूंना मंदिरातील पैसा देणे, हे दुर्दैव ! – अस्मित कोंडालकर, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

अस्मित कोंडालकर, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

जे अहिंदू मंदिरात जात नाही, मंदिरात माथा टेकवत नाहीत, त्या अहिंदूंना मंदिरातील धन का दिले जाते ? हिंदु धर्मावरील या आघाताविषयी शासनाने कठोर कारवाई करायला हवी. आज मंदिरे सुरक्षित नाहीत. मंदिरांच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यक आहे.

या वेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.

आंदोलनाला उपस्थित मान्यवर

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे मुंबई जिल्ह्याचे कार्यवाह श्री. बळवंतराव दळवी, बजरंग दलाचे सर्वश्री विशाल पटनी, संजय उवलेकर, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. आनंद मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. चंद्रकांत गिरी, शिवसेनेचे श्री. प्रवीण हंबर्डे, योग वेदांत समितीचे श्री. हरिश यादव, गोरक्षक श्री. संदीप शर्मा, श्रीकृष्ण मंदिर-मुंबईचे श्री. विजय ठोंबरे, हिंदू रक्षक सेनेचे श्री. ऋषीकेश दुबे, श्रीराम हिंदु सेनेचे श्री. अनिल जैसवाल, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *