जमावाकडून जेसीबीची तोडफोड
प्रशासनाने असा हलगर्जीपणा कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या विषयी दाखवला असता का ? या धर्महानीसाठी सरकारकडून उत्तरदायींवर कठोरात कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इंदूर : महानगरपालिकेकडून येथील बिजासनमाता मंदिराजवळील घरे आणि दुकाने यांचे अतिक्रमण पाडले जात असतांना श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित झाली. ही घटना समजताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र झाले. भंगलेली मूर्ती पाहून नागरिक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणा देत जेसीबी यंत्राची तोडफोड केली. यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी आला. त्यांनी संतप्त नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर अतिक्रमणाचे काम थांबवण्यात आले आहे. ‘बिजासन मंदिर विकास योजने’अंतर्गत पालिकेकडून १३ मार्चपासूनच मंदिराच्या परिसरातील पुजार्यांची घरे, तसेच इतर दुकाने हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
१४ मार्चलाही ही कारवाई चालू होती. या वेळी एक अनधिकृत भिंत पाडतांना भिंतीचा भाग थेट श्री लक्ष्मीमातेच्या मूर्तीवर पडला आणि मूर्ती भंगली.(अतिक्रमण पाडतांना योग्य काळजी का घेतली गेली नाही ?, हेही जनतेला कळायला हवे ! हा पराकोटीचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अतिक्रमणाच्या वेळी पुरेसे पोलीस बळ मिळाले नसल्याचा आरोप महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त देवेंद्र सिंह यांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात