कप्पनाहळ्ळी, शिकारीपूर (कर्नाटक) : आमच्या शिक्षण व्यवस्थेत धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. ६४ लाख यहुदींसाठी ईस्रायल नावाचे राष्ट्र आहे; परंतु जगभरात १६ टक्के (११६ कोटी) असणार्या हिंदूंचे मात्र एकही राष्ट्र नाही. याला कारण आपली शिक्षणव्यवस्था आहे. त्यामुळे आपण आपल्या घरालाच गुरुकुल बनवूया आणि आपल्या घरापासूनच धर्मशिक्षणाला प्रारंभ करून भारताला हिंदु राष्ट्र बनवूया, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. नागराज ए.एम्. यांनी हिंदु धर्मजागृती सभेत केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शासकीय प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. चन्द्र मोगेर आणि सनातन संस्थेच्या सौ. कावेरी रायकर यांनीही संबोधित केले. या सभेला ६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी श्री. चन्द्र मोगेर म्हणाले, ‘‘वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊन मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आला. त्या वेळी देशात २ टक्के असणारे मुसलमान वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार १७ टक्के झाले.’’
सौ. कावेरी रायकर म्हणाल्या, ‘‘अखिल विश्वाला आर्य म्हणजे सुसंस्कृत बनवूया’, असे आपल्या पूर्वजांचे ध्येय होते. त्यामुळे आपल्याला केवळ भारतालाच हिंदु राष्ट्र करायचे नाही, तर संपूर्ण जगातच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे ध्येय ठेवूया.’’
क्षणचित्र
सभेच्या पूर्वी गावात धर्मफेरी काढण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात