कोल्हापूर : कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीला कारणीभूत असणारे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना आठ दिवसांच्या आत अटक करावी; अन्यथा २६ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात श्री. मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या निषेधार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी (बंडा) साळुंखे म्हणाले, ‘‘हा प्रकार म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ होय. जातीय तेढ निर्माण करण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्यावर पोलिसांकडून काहीच कारवाई होत नाही; मात्र पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांची नावे मात्र जाणीवपूर्वक गुंतवली आहेत.’’
या वेळी बजरंग दल शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, हिंदु धर्माभिमानी श्री. आेंकार लाड, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, अधिवक्ता केदार मुनीश्वर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, हिंदू एकताचे श्री. अण्णा पोतदार आणि श्री. चंद्रकांत बराले, वन्देमातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये, सर्वश्री अभय मुनिश्वर, युवराज पाटील, हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्ष दीपाली खाडे यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या संदर्भात १७ मार्च या दिवशी जिल्हाधिकार्यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात