शिवरायांचा अवमान करणार्या उसगाव आणि वाळपई येथील घटनांचा शिवप्रेमींकडून तीव्र निषेध
म्हापसा : हल्लीच गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना घडल्या. जगासाठी आदर्श असलेल्या शिवरायांच्या पुतळयांची गोव्यात कोणाला भीती वाटते ? असा संतप्त प्रश्न समस्त शिवप्रेमी संघटनांनी शासनाला विचारला आहे. तसेच शिवरायांचे पुतळे शिवप्रेमींना परत करावे आणि संबधित शासकीय अधिकार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली.
येथील सुहास हॉटेलमध्ये शिवप्रेमींनी पत्रकार परिषद घेऊन या दुर्दैवी घटनांचा निषेध केला. या वेळी गोवा ९६ कुळी मराठा संघ, बार्देशचे अध्यक्ष श्री. सुहास नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. भाई पंडित, शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख श्री. रमेश नाईक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी आदी उपस्थित होते.
दडपशाही करून जनतेला गृहित धरणार्या शासकीय अधिकार्यांना त्वरित बडतर्फ करावे ! – रमेश नाईक, शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख
देशात लोकशाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हलवतांना स्थानिक शिवप्रेमी नागरिकांना विश्वासात का घेतले नाही ? वाळपई येथे पालिका मुख्याधिकार्यांनी रात्रीच्या काळोखात शिवरायांचा पुतळा हटवला. अशा प्रकारे दडपशाही करून जनतेला गृहित धरणार्या शासकीय अधिकार्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावे. शिवरायांचे पुतळे अशा पद्धतीने हटवणारे अन्य धर्मियांच्या संदर्भात सौम्य धोरण का अवलंबतात ? कळंगुट येथे एका क्रॉससाठी वाहतूक बेट सिद्ध करून त्याच्या कक्षा रुंदावल्या जात आहेत. हा कसला निधर्मीवाद ? धाडस असेल, तर त्यावर कारवाई करून दाखवा ?
छत्रपतींना डोळ्यांसमोरून आणि मनातून हटवण्याची मोहीम चालू आहे का ? – सुहास नाईक, गोवा ९६ कुळी मराठा संघ, बार्देश
यंदा शिवरायांच्या गोमंतक भूमीतील आगमनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. होळीच्या वेळी वाळपईत, तर ऐन नववर्ष स्वागताच्या पूर्वी शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण घालणार्या घटना घडत आहेत. अशा कारवाया हिंदूंना मुद्दाम त्रस्त करण्यासाठीच केल्या जात आहेत का ? छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनी शिवप्रेमींवर या घटनांचा निषेध करण्याची वेळ आली आहे, हे निंदनीय अन् दुर्दैवी आहे. पुस्तकातून शिवरायांना हटवले गेले होते, आता दृश्य स्वरूपातील पुतळेही हटवणे, म्हणजे छत्रपतींना डोळ्यांसमोरून आणि मनातून हटवण्याची मोहीम चालू आहे का ? गोवा ९६ कुळी मराठा संघ, बार्देश संघटनेच्या वतीने या घटनांचा आम्ही निषेध करतो.
शिवरायांचे पुतळे हटवण्यामागे कोणाला खुश केले जात आहे, हे जनता जाणून आहे ! – भाई पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर महासंघ
खोर्ली, म्हापसा येथे गेल्या वर्षी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कोमुनिदाद भूमीत ३१ डिसेंबरला एका रात्रीत अचानक अवैधरित्या उभ्या केलेल्या क्रॉससंबधी मी स्वतः अन्य काही जागृत नागरिकांसह नगरपालिका अन् उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. याचा १ वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे. या क्रॉसची पाहणी करून तो हटवण्याचा आदेश निघाला, तरीही अद्याप तो हटवला गेला नाही. इथे मात्र एका मासात शिवरायांचे २ पुतळे हटवले जातात. हा भेदभाव का ? कोणाला खुश करण्यासाठी शिवरायांचे पुतळे तातडीने हटवले जात आहेत, हे न समजण्याला जनता आता दूधखुळी नाही.
मोती डोंगरावरील अवैध वस्ती हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही ? – जयेश थळी, हिंदु जनजागृती समिती
प्रशासनाने हटवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कुठे ठेवले आहेत ? पुतळे हटवतांना काळजी घेतली गेली का ? अयोग्य ठिकाणी पुतळे ठेवून शिवाजी महाराजांचा अवमान तर केला नसेल ना ? शिवप्रेमींना हे पुतळे दाखवले पाहिजेत आणि ते शिवप्रेमींना परत करायला हवेत. पुतळे अवैध असल्यामुळे हटवले गेले असतील, तर प्रशासन मोती डोंगरावरील अवैध वस्ती हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाही ? तसेच मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई कधी करणार ? त्याचप्रमाणे घोगळ, मडगाव चौकातील फ्लोरियानो वाझ यांचा पुतळा वैध आहे का ? हेही सांगावे.
तिस्क-उसगाव येथे शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारीला बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १६ मार्चला सकाळी हटवण्यात आला होता. पोलीस संरक्षणात पुतळा हटवल्याचे वृत्त तिस्क-उसगाव परिसरात पसरताच स्थानिक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. स्थानिक शिवप्रेमींनी एक बैठक घेऊन या घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिस्क येथे पुन्हा उभारण्याविषयी योग्य ती पावले उचलली जातील, असे तिस्क-उसगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेश नाईक यांनी सांगितले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात