विलासपूर (यमुनानगर, हरियाणा) : महर्षि वाग्भट यांनी लिहिलेला अष्टांंगहृदयम् या ग्रंथामध्ये ‘चांगले वैद्य कसे बनायचे आणि समाज, राष्ट्र आणि धर्म यांची चांगली सेवा कशी करायची ?’ या सूत्रांवर प्रकाश टाकला आहे. पंचमहाभूतांच्या आधारावर त्रिदोष सिद्धांताचे वर्णन करण्यात आले आहे. हा आयुर्वेद चिकित्सेचा मुख्य पाया आहे. दोषरहित असणाराच दुसर्यांचे दोष दूर करू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. ते जागतिक महिला दिनानिमित्त येथील लाल बहाद्दूर शास्त्री महिला आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महेंद्र कुमार अग्रवाल, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘ऋषि-मुनी यांच्याकडून करण्यात येणार्या चिकित्सेमध्ये आध्यात्मिक स्तराला अधिक महत्त्व दिले जात असे. त्यामुळे रुग्ण चांगल्या प्रकारे बरे होत होते. रुग्णाची तपासणी करतांना आपले मन स्थिर आणि प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. ही स्थिरता साधना केल्यानेच प्राप्त होते. साधनेमुळे आपल्यातील आभामंडल सात्त्विक आणि चैतन्यदायी बनते. ते कार्य करू लागते.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात