Menu Close

फलक त्वरित काढा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारणार ! – शिवप्रेमींची चेतावणी

रेडी (सिंधुदुर्ग) येथील यशवंत गड खासगी मालकीचा असल्याचा मूनराइज टुरिझम् आस्थापनाचा फलक लागल्याने शिवप्रेमींमध्ये संताप !

वेंगुर्ले : तालुक्यातील रेडी येथील यशवंत गड या ऐतिहासिक शिवकालीन पुरातन वास्तूच्या प्रवेशद्वारावर मूनराइज टुरिझम् प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया या खासगी  आस्थापनाने ऐतिहासिक यशवंत गड ही वास्तू खासगी मालमत्ता आहे, अशा आशयाचा फलक लावला आहे. अनधिकृतपणे लावलेला फलक कायदेशीर कारवाई करून त्वरित हटवावा, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, अशी चेतावणी शिवप्रेमी आणि रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी तहसीलदार शरद गोसावी यांना एका निवेदनाद्वारे दिली. या वेळी तहसीलदार गोसावी यांनी या गडाच्या विक्रीची नोंद शासकीय अभिलेखात नाही, असे सांगितले. त्यामुळे शासकीय अभिलेखात गडाच्या विक्रीची नोंद नसतांनाही खासगी आस्थापन असा फलक कसा लावू शकते ? असा प्रश्‍न शिवप्रेमींतून विचारला जात आहे.

महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहासानुसार यशंवतगड ही शेकडो वर्षांची वास्तू आहे. या वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, जागतिक महिलादिन यांसारखे विविध उपक्रम या गडावर साजरे करतात. महाराष्ट्रातील सहस्रो विद्यार्थी आणि पर्यटक या पुरातन वास्तूस भेट देतात. असे असतांना यशवंत गडावर मूनराइज टुरिझम् प्रायव्हेट लिमिटेड इंडिया या खासगी आस्थापनाने यशवंतगड ही वास्तू खाजगी आहे, असा फलक गडाच्या प्रवेशद्वारावर लावलेला असल्याने येथे भेट देणार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पर्यटनवृद्धीसाठी भविष्यात प्रसंगी सिंधुदुर्ग किल्ला खासगी आस्थापनांना देण्याचा घाट घातला जात आहे, अशी भीती व्यक्त करत मालवणमध्ये काही मासांपूर्वी शिवप्रेमींनीच हेतूपुरस्सर शासनाचा विरोध म्हणून सिंधुदुर्ग किल्ला विकणे आहे, असे उपरोधिक फलक लावले होते. त्या वेळी या शिवप्रेमींवरच कारवाई करण्यात आली होती. यशवंत गडावर लावलेल्या मूनराइज टुरिझम् आस्थापनाच्या फलकांमुळे शिवप्रेमींची ही भीती खरी ठरते कि काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. (पर्यटनाच्या माध्यमातून विकास करतांना देशाची ऐतिहासिक संपत्ती उद्ध्वस्त होणार नाही, याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. – संपादक)

याविषयी पुरातत्व खात्याकडून अधिक माहिती घेण्यात येईल, असे तहसीलदार गोसावी यांनी शिवप्रेमींना सांगितले.

जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, रेडी गावचे सरपंच रामसिंह राणे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे, डॉ. संजीव लिंगवत, प्रभाकर परब, सागर नाणोसकर, प्रदीप बागायतकर, राहुल राणे, राजू शेणई, परेश साळगावकर, सौरभ नागोलकर, शितल साळगावकर, मिलिंद परब, सुमित राणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सावंतवाडीचे सुमित नलावडे, शुभम घावरे, आकाश किल्लारे, एकनाथ जाधव, अक्षय पंडित आदी शिवप्रेमी उपस्थित होते. शिवप्रेमींनी शहरातून  दूचाकी वाहनफेरी काढत तहसीलदार आणि पोलीस ठाणे येथे निवेदन दिले.

यशवंत गडाचा संक्षिप्त इतिहास

इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. १६ व्या शतकाच्या आसपास हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाने बांधला असावा, असेही काही इतिहासकार सांगतात. १६६४ च्या सुमारास मालवणच्या कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. त्याच सुमारास यशवंतगड महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्याची दुरुस्ती करून आज दिसते त्याप्रमाणे त्यास बळकट, असे रूप तर दिलेच, तसेच यशवंतगड हे नावही त्यांनीच दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा गड सावंतवाडीकर फोंड सावंत, इंग्रज व्यापारी अधिकारी मेजर गोर्डेन आणि कॅप्टन वॉटसन, पुन्हा सावंतवाडीकर भोसले यांच्या कह्यात होता. वर्ष १८८१ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला, अशी नोंद आढळते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या किल्ल्याची स्थिती उत्तम होती; मात्र त्यानंतर स्थिती ढासळत गेली. सध्या आवश्यकता आहे ती हा गड संवर्धित करण्याची आणि जगासमोर आणण्याचीसुद्धा ! या गडाच्या प्रवेशद्वारावर Moonrise Tourism pvt Ltd ने Land Owner म्हणून स्वतःचा फलक लावलेला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *