श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरण
अलिबाग : प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर हे समस्त गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून गणेशभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक गणपति मंदिराच्या न्यासाच्या केलेल्या तपासणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्वस्तांकडून अपहार केल्याचे उघड झाले आहे. अशा भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कठोर शासन करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केली. १२ मार्च या दिवशी येथील शासकीय विश्रामगृहात श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी धर्मप्रेमी श्री. रघुजीराजे आंग्रे, श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. अजय संभूस उपस्थित होते.
या वेळी श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे समन्वय अजय संभूस म्हणाले की, विश्वस्त प्रवीण नाईक यांनी हे आरोप नाकारले आहेत; मात्र ते धादांत खोटे बोलत आहेत. सकृतदर्शनी तरी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेले पुरावे श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीकडे उपलब्ध आहेत. श्री. नाईक यांच्या म्हणण्यानुसार जर ही देयके खोटी असतील, तर ती त्यांच्या नावे कशी प्रविष्ट केली गेली, याचा त्यांनी शोध घऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात