हिंदुत्वाच्या विश्वविजयाची गुढी उभारण्यास हिंदुत्वनिष्ठ सज्ज !
ठाणे : शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या साधकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली. वर्तकनगर येथेही समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. या वेळी सौ. केशर गिरकर आणि सौ. सकपाळ यांनी गुढी उभारण्याचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक दाखवले.
आजच्या शुभदिनी आपण महापुरुषांच्या पराक्रमाचे स्मरण करून आपले शौर्य जागृत करूया ! – महेश मुळीक, हिंदु जनजागृती समिती
डोंबिवली : आजवर हिंदूंचा जाज्ज्वल्य इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला, कारण खरा इतिहास लक्षात आल्यास हिंदू जागृत होतात. मग हिंदूंना जातीपातीत विभागून त्यांच्यात फूट पाडणे शक्य होत नाही. याचसाठी गुढीपाडवा हे हिंदूंचे नववर्ष नसून फक्त मराठी सण आहे; असा खोटा प्रचार केला जातो; परंतु आपल्या देशात दसरा, दिवाळी, नवरात्र हे सगळे सण जर आपण एकाच दिवशी एकाच तिथीला साजरे करतो, ते भाषेनुसार, राज्यानुसार पालटत नाहीत मग नवीन वर्षाचा दिवस, ती तिथी वेगळी कशी असेल ? आजच्या शुभदिनी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करून आपल्यातले शौर्य जागृत करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश मुळीक यांनी केले. उत्तरशिव गाव येथील हनुमान मंदिरासमोरील मैदानात येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘एक गाव एक गुढी’ उपक्रमाच्या अंतर्गत सामूहिक गुढीपूजन करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ६० धर्माभिमान्यांनी घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालनही उपस्थित होत्या.
स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील मुलांंनी या कार्यक्रमाची सिद्धता केली. श्री. विनोद पाटील आणि सौ. नीता पाटील यांनी गुढीचे पूजन केले. गावातील प्रशिक्षणवर्गातील कु. दीक्षिता पाटील आणि कु. ऋतुजा पाटील यांनी ‘स्वसंरक्षणाची आवश्यकता’ हा विषय मांडला. उत्तरशिव ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. रमेश पाटील यांनी सांगितले, ‘‘संघटन निर्माण करण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे तुमचे कार्य फारच छान आहे.’’
२. उत्तरशिव येथे चालू असलेल्या प्रशिक्षणवर्गातील मुलांनी आदल्या दिवशी मंदिर आणि मंदिर परिसर यांची स्वच्छता केली, तसेच कार्यक्रमाचा प्रसारही केला.
३. धर्मप्रेमी मुलांनी आणि मुलींनी कराटे आणि लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
४. कु. ऋतुजा पाटील यांनी सांगितले, ‘‘आतापर्यंत मी कधीच लोकांसमोर बोलले नाही. स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून मला आत्मविश्वास येऊन मी बोलू शकले.’’
५. कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
६. गुढीपूजन झाल्यावर सर्वांनी सामूहिक आरती केली आणि हनुमानाला कार्यक्रमाचा उद्देश सफल होण्यासाठी प्रार्थना केली.
अंबरनाथ : पूर्व भागातील गावदेवी मंदिर, कानसई येथे सामूहिक गुढीचे आयोजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वैशाली देसाई यांनी गुढी उभारण्याचे शास्त्र सांगून त्याप्रमाणे गुढी उभारली. नववर्ष स्वागतयात्रा फेरीत सहभागी झाल्याविषयी हिंदु जनजागृती समितीला सन्मानचिन्ह देण्यात आले.
क्षणचित्रे
१. गुढीच्या पूजनाची संपूर्ण सिद्धता श्री. आणि सौ. भोईर यांनी केली. ‘पहिल्यांदा गुढी उभारण्याचा आनंद घेतला आला’, असे मत श्री. भोईर यांनी या वेळी व्यक्त केले.
२. गुढीच्या पूजनानंतर सगळ्यांनी सामूहिकरित्या ५ मिनिटे ‘श्रीराम जयराम जय जय राम’चा जप केला.
भिवंडी येथील (डावीकडे) साईनाथ पवार यांना शुभेच्छा पत्र देतांना समितीचे श्री. प्रशांत सुर्वे
भिवंडी : जांगिड लेक, मानसरोवर, भिवंडी येथे सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले. श्री. श्रीनिवास कोंगारी यांच्या पुढाकारने ही गुढी उभारण्यात आली. शिवसेनेचे श्री. साईनाथ पवार, भाजपचे नगरसेवसक आणि गटनेता श्री. नीलेश चौधरी, भाजप शहर प्रमुख श्री. संतोष शेट्टी इत्यादी मान्यवरांना हिंदु जनजागती समितीच्या वतीने नववर्षानिमित्त शुभेच्छा पत्रक देण्यात आले.
कल्याण येथे हिंदु धार्मिक सणांचा संदेश देणारी ‘हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा’ !
कल्याण : येथील मुरबाड रोड येथून प्रारंभ झालेल्या नववर्ष शोभायात्रेत सहस्रो हिंदू पारंपरिक वेषात ढोलताशांच्या गजरात सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्ताने कल्याण सांस्कृतिक मंच आयोजित नववर्ष शोभायात्रेचे हे १९ वे वर्ष होते. हिंदूंचे धार्मिक सण आणि त्यांचे महत्त्व सांगणारे चित्ररथ, देखावे हे या स्वागत यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. कल्याणचे महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांनी सपत्निक विधिवत पूजा करून या यात्रेचा आरंभ झाला. कल्याणचे आमदार श्री. नरेंद्र पवार, खासदार श्री. कपिल पाटील यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती नववर्ष स्वागत शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नमस्कार मंडळ येथे शोभायात्रेची सांगता झाली.
५० हून अधिक सामाजिक संस्था सहभागी झालेल्या या शोभायात्रेत १० सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाल्याचे नववर्ष स्वागत यात्राचे यंदाचे अध्यक्ष श्री. गौतम दिवाडकर यांनी सांगितले. जागोजागी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. संस्कारभारतीच्या रांगोळ्यांनी शहर सुशोभित करण्यात आले होते. शहरातील भगवा तलाव परिसरातील दिव्यांची रोषणाई आणि आवाजविरहित फटाक्यांची आतिषबाजी हे या स्वागतयात्राचे मुख्य आकर्षण ठरले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात