Menu Close

संगमेश्वर तालुक्यातील प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिर

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर.

संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर ‘कर्णेश्वर’ नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.

मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे.

कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘शिवपंचायत’ आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.

प्रवेशद्वारावर कोरण्यात आलेल्या मूर्ती

प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे.

दशावताराचे शिल्प

द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात.

उपडे ताट

मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो.

नंदी

मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे.

शंकराची पिंडी

मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे.

शेषशायी विष्णूची मूर्ती

मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.

कोरीव काम

मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे.

सूर्यमूर्ती

मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच ‘संगमेश्वर’ नाव प्रचलित झाले.

अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम

अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते.

संदर्भ : वेब दुनिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *