कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पत्रकार परिषदेत मागणी
२८ मार्च या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा
कोल्हापूर : दलित बांधव हिंदु समाजाचा घटक असतांना त्यांचा जातीय राजकारणासाठी वापर करत ‘हिंदु विरुद्ध दलित’ असे चित्र रंगवणारे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांना अटक करावी, तसेच श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, समस्त हिंदू आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे आणि हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, यांसह अन्य मागण्यांसाठी २८ मार्च या दिवशी कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना भव्य मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २२ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद हिंदु एकता आंदोलन या संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आली.
प्रारंभी बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी मोर्च्याच्या आयोजनाचा उद्देश सांगून ‘२८ मार्च या दिवशी बिंदू चौकातून सकाळी ११ वाजता मोर्च्याला प्रारंभ होईल’, असे सांगितले. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि शिवसेनेचे श्री. रणजित आयरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी हिंदु महासभा, हिंदु एकता आंदोलन, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्च्यामध्ये करण्यात येणार्या अन्य मागण्या
१. कोल्हापुरातील जनतेची झालेली हानीभरपाई त्वरित मिळावी.
२. ऊठसूठ जातीयवाद निर्माण करणार्या आणि खोटी निवेदने देऊन सरकारी कामात अडथळे आणणार्या भारिप अन् कम्युनिस्ट पक्ष यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात