विजापूर, शिवमोग्गा आणि मंगळुरू येथे आंदोलन
लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय, ही काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’ नीती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे केली.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजापूर, शिवमोग्गा आणि मंगळुरू येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हातात भगवे झेंडे धरले होते, तसेच त्यांनी उत्स्फूर्त घोषणाही दिल्या. आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर केले. आंदोलनानंतर वरील ठिकाणी विविध हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थितांना संबोधित केले.
प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. वास्तविक शैव आणि वैष्णव हे हिंदु धर्माचे मूलभूत अंग आहे. अवतारी कार्य करणारे आणि आध्यात्मिक उन्नत संत, हेच धर्मसंस्थापनेचे कार्य करू शकतात. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा अधिकारच राज्यकर्त्यांना नाही. असे करून हिंदु धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान काँग्रेस करत आहे.
२. मुळात लिंगायत वीरशैव हे हिंदु धर्माचे भाग आहेत. वेगळ्या लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या गोष्टीला वीरशैव धर्मगुरूंनी ठामपणे विरोध केला आहे.
३. देशभरातील वीरशैव-लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या ‘अखिल भारतीय वीरशैव महासभे’नेही यास विरोध दर्शवला आहे. ‘महात्मा बसवेश्वरांच्या नावे धर्मात फूट पाडणे योग्य नाही’, असे श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्ध पंडिताराध्य यांनी सांगितले आहे.
४. रंभापुरी आणि काशी येथील जगद्गुरूंनीही काँग्रेसच्या या निर्णयास विरोध केला आहे. मुळात लिंगायत हा शब्दच धर्मवाचक नाही, तर तो एक दीक्षा संस्कार आहे.
५. तत्कालीन काँग्रेसच्या केंद्रशासनाने वर्ष २०१३ मध्ये याचप्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता. तेच काँग्रेस शासन आता केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याचा निर्णय घेत आहे.
६. लिंगायत समाजास स्वतंत्र धर्माची मान्यता दिल्यास उद्या आणखी काही समाज स्वतंत्र धर्माची मागणी करू लागतील आणि असे झाल्यास हिंदु समाजाची एकात्मता धोक्यात येईल आणि देशात अराजक माजेल.
७. भगवान शिवाची उपासना करणारा भक्त दोन वेगळ्या धर्मांचा कसा असू शकतो ? एकच उपास्यदैवत असलेल्या भक्तांमध्ये देव भेद मानत नाही, तर राज्यकर्ते असे का करत आहेत ?
८. तरी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘लिंगायत’ समाजास स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय रहित करण्यात यावा.
आंदोलनात सहभागी संघटना
१. विजापूर येथील आंदोलनात विश्व हिंदु युवा सेनेचे श्री. संतोष विश्वकर्मा, श्रीराम सेनेचे श्री. आनंद कुलकर्णी आणि श्री. बसवराज कल्याणप्पगंळ, योग वेदांत समितीचे श्री. सुभाष खत्री आणि श्री. हरीश गायकवाड, सनातन संस्थेचे श्रीमती गंगा वठार, धर्मप्रेमी श्री. सागर देशमुख, श्री. संगनगौड पाटील आदी उपस्थित होते. येथे हिंदुत्वनिष्ठांच्या एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी एच्. प्रसन्न यांना निवेदन दिले.
२. शिवमोग्गा येथील आंदोलनात राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन, मराठा संघ, परिसर वेदिके, विहिंप, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथेही प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
३. मंगळुरू येथील आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, हिंदु महासभा, तुळुनाड रक्षण वेदिके आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात