-
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांचे परखड मत
-
श्री महालक्ष्मी मंदिरात धार्मिकता जोपासण्यास प्राधान्य
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यापूर्वीच्या संचालकांकडून झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती घेत आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकाला शिक्षा केली जाईल. कोणालाही या प्रकरणात दया दाखवली जाणार नाही, असे परखड मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी व्यक्त केले. दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी मंदिराचे प्रश्न यांविषयी चर्चा केली. तेव्हा ते बोलत होते. ‘श्री महालक्ष्मी मंदिरात धार्मिकता जोपासण्यास प्राधान्य देण्यात येईल’, असेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
या वेळी महेश जाधव म्हणाले…
१. मी ६ मासांपासून समितीचा कारभार पहात आहे. समितीच्या कारभाराचीही माहिती घेत आहे. या सहा मासांत श्री महालक्ष्मी मंदिरात काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.
२. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मंदिर परिसरात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
३. मंदिर परिसरात येणार्या भाविकांना अचानक त्रास झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी एका आधुनिक वैद्याची सोय करण्यात आली आहे. मंदिर उघडल्यापासून ते बंद होईपर्यंत हे आधुनिक वैद्य कार्यरत असतील.
४. श्री महालक्ष्मीदेवीच्या देश-विदेशातील भक्तांना २४ घंटे दर्शन घेण्याची सुविधा थेट प्रक्षेपणाद्वारे उपलब्ध करून दिली आहे.
५. मंदिराचा प्रचार होण्यासाठी विशेष बोधचिन्ह सिद्ध करून घेतले असून ते प्रत्येक कागदपत्रावर वापरण्यात येत आहे. मंदिराच्या वतीने दिनदर्शिकाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
६. गरुडमंडपात प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ ते ४ या वेळेत १०१ महिलांसाठी कुंकूमार्चनाची सोय केली आहे. यासाठी प्रत्येक सोमवारी १० ते दुपारी १२ या वेळेत नावनोंदणी करण्यात येते. देवीचे यंत्र, कुंकू, तसेच अन्य वस्तू यांसह या महिलांची ओटी भरण्यात येते.
७. भवानी मंडपात सांस्कृतिक कार्यक्रम, भावगीत, भक्तीगीत, जागर, गोंधळ, देशभक्तीपर गीते घेण्यात येत आहेत.
८. मनकर्णिका कुंडाची जागा महापालिकेच्या कह्यात असल्याने तेथे आम्हाला अधिक काही करता येत नाही. महापालिकेकडूनही सहकार्य मिळत नसल्याने हा प्रश्न सोडवता येत नाही. कुंड खुले करण्यासाठी लवकरच योग्य तो निर्णय व्हावा; म्हणून प्रयत्न करू.
९. किरणोत्सवात मंदिर परिसरात असणार्या उंच इमारती अडथळा ठरत आहेत. हे अतिक्रमण हटवण्यासाठीही महापालिकेकडून विशेष सहकार्य मिळत नाही.
१०. हे मंदिर प्राचीन ठेवा असून तेथे सात्त्विकता टिकवण्यासाठी, त्याचा इतिहास समोर आणण्यासाठी माझे प्रयत्न असतील ! सरकारकडून मंदिराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणून मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात