पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील मागणी
पुणे : केंद्र सरकारनेे १६ जानेवारीला हज यात्रेवरील अनुदान बंद केले, असे जाहीर केल्यानंतर जेमतेम दीड मासाच्या आतच म्हणजे २७ फेब्रुवारीला हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात घोषित करून मुसलमानांना खुश केले. एकीकडे ‘एअर इंडिया’ हे शासकीय विमान आस्थापन तोट्यात असल्याने तिचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असतांना दुसरीकडे हज यात्रेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सवलत देऊन या आस्थापनाचे उत्पन्न बुडवले जात आहे. ही कोणती व्यवहार्यता आहे ? हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमानप्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रकार आहे. शासन एकीकडे अमरनाथ यात्रेकरूंची संख्या नियंत्रित करते आणि हज यात्रेकरूंची संख्या १ लक्ष ७५ सहस्र २५ करून गेल्या ७० वर्षांतील उच्चांक गाठते, हाही विरोधाभासच आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेे हज यात्रेसाठी हवाई प्रवासभाड्यामध्ये केलेली भरघोस कपात त्वरित रहित करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केली. येथे २१ मार्च या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी ६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. आंदोलनातील मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विजयसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
श्री सिद्धीविनायक मंदिराच्या अर्पणनिधीमध्ये भ्रष्टाचार करणार्या माजी विश्वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा ! – कु. क्रांती पेटकर
वर्ष २०१६ मध्ये मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या केलेल्या तपासणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. १.१.२०१५ ते ३१.८.२०१६ या काळात तत्कालीन विश्वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांच्या संदर्भातील अभ्यास दौर्याच्या नावाखाली १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपये व्यय केला. श्री सिद्धीविनायक मंदिर कायदा विश्वस्तांना अशा प्रवासखर्चाची अनुमतीच देत नाही. यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते. त्यामुळे विनाअनुमती अभ्यास दौर्यांवर मंदिर विश्वस्तांनी केलेला खर्च नियमबाह्य ठरतो. जलयुक्त शिवाराचे पैसे शासनालाच दिले आहेत, तर दौरा करायची आवश्यकता काय होती ? यांसारखी अनेक सूत्रे तपासणीत आढळली असून हे सर्व अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी देवनिधीवर डल्ला मारणार्या संबंधित विश्वस्तांवर फसवणुकीचे आणि अफरातफरीचे गुन्हे प्रविष्ट करावेत.
धर्मादाय रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञ आणि कार्यक्षम आधुनिक वैद्यांची नियुक्ती करावी
डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने गेल्या ३ वर्षांत गलथान कारभार केल्याच्या संदर्भातही आंदोलनात विरोध दर्शवण्यात आला. धर्मादाय रुग्णालयांवर देखरेख करण्यासाठी कार्यक्षम आधुनिक वैद्यांची नियुक्ती करावी, तसेच सरकारनेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
भ्रष्टाचार्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवावा ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर
देवस्थानांमध्ये भाविक भक्तीभावाने पैसा अर्पण करतात. त्याचा सुविनियोगच व्हायला हवा; मात्र देवस्थानांचे विश्वस्त सेवकभावाने वागत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे.
हज यात्रेसाठी अनुदान देणे आणि हिंदूंच्या यात्रांवर कपात करणे हा अन्याय आहे. या अन्यायकारी लोकांची जागा कारागृहात आहे. – अधिवक्ता मोहनराव डोंगरे
कर्करोगाच्या रुग्णाकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला पाठिंबा !
आंदोलनस्थळी समाजातील एका व्यक्तीने येऊन सांगितलेे, ‘‘मी कर्करोगाचा रुग्ण असून माझ्यासारख्या असंख्य रुग्णाईतांना योग्य न्याय मिळावा, यासाठी तुम्ही हे आंदोलन घेत आहात, हे पाहून समाधान वाटते. या भ्रष्ट कार्यप्रणालीच्या विरोधात निःस्वार्थपणे आवाज उठवणारी हिंदु जनजागृती समिती ही एकमेव संघटना आहे. आमचा समितीला सदैव पाठिंबा राहील.’’
क्षणचित्रे
१. एक वृद्ध वारकरीही आंदोलनात सहभागी झाले होते.
२. आंदोलनाचे फेसबूकवरून ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात