१० सहस्रांहून अधिक हिंदूप्रेमी संघटित हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
जमदेशपूर (झारखंड) : येथे ‘हिंदु उत्सव समिती’च्या वतीने नववर्षाच्या पूर्व संध्येला भव्य वाहनफेरी काढण्यात आली. ‘हिंदु नववर्ष यात्रा’ या नावाने काढण्यात आलेल्या या फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या फेरीच्या निमित्ताने १० सहस्रांहून अधिक हिंदूप्रेमी संघटित झाले होते. या फेरीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवर्षाच्या पत्रकांचे वितरण करण्यात आले, तसेच कापडी फलकांच्या माध्यमातून धर्मजागृती करण्यात आली.
क्षणचित्र
नववर्ष फेरीच्या निमित्ताने संपूर्ण शहर भगव्या पताकांनी सजले होते. नववर्षाच्या शुभेच्छा आणि वाहनफेरीचे स्वागत यांचा संदेश असलेले अनेक भव्य फलक शहरात झळकत होते. या फेरीच्या मार्गावरील दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवून फेरीत सहभाग घेतला.
सनातन संस्थेच्या वतीने धर्मध्वजपूजन
जमशेदपूर (झारखंड) : सनातन संस्थेच्या वतीने येथील साकची शीतला मंदिराच्या परिसरात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नववर्षाच्या निमित्ताने धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. संस्थेचे साधक श्री. बी.भी. कृष्णा आणि सौ. अश्विनी यांनी यजमानपद भूषवले, तर श्री. सुदामा शर्मा यांनी पूजा सांगितली. या वेळी सनातनचे साधक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. या कार्यक्रमासाठी साकची शीतला मंदिर समितीचे सहकार्य लाभले.
क्षणचित्र
जमशेदपूर येथील पोलीस उपअधीक्षक श्री. अनुदीप सिंह यांनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी धर्मध्वजपूजनाचे महत्त्व जाणून घेतले, तसेच सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात