Menu Close

लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय, ही काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’ नीती ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जनआंदोलन

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई : कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तेथील काँग्रेस सरकारने राज्यातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडण्याचा निर्णय १९ मार्चला झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

वास्तविक शैव आणि वैष्णव हे हिंदु धर्माचे मूलभूत अंग आहेत. अवतारी कार्य करणारे आणि आध्यात्मिक उन्नत संत, हेच धर्मसंस्थापनेचे कार्य करू शकतात. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा अधिकारच राज्यकर्त्यांना नाही. लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ही काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’ ही (कु)नीती आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केला. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाच्या विरोधात २३ मार्चला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनाला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. विजय जंगम यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, हिंदू एकता जागृती समिती, सनातन युवा संघटना, श्री साईलिला मित्रमंडळ या संघटना सहभागी झाल्या होत्या.

या वेळी डॉ. उदय धुरी म्हणाले, ‘‘तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र शासनाने वर्ष २०१३ मध्ये याच प्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता. तेच काँग्रेस शासन आता केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माचा निर्णय घेत आहे.

वेगळ्या लिंगायत धर्माची स्थापना, हे देशावरील धार्मिक आक्रमण ! – डॉ. विजय जंगम

देशभरातील वीरशैव-लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अखिल भारतीय वीरशैव महासभेने याला विरोध केला आहे. ‘‘महात्मा बसवेश्‍वर यांच्या नावे धर्मात फूट पाडणे योग्य नाही’’, असे श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्ध पंडिताराध्य यांनी सांगितले आहे. रंभापुरी आणि काशी जगद्गुरूंनीही याला विरोध केला आहे. मुळात ‘लिंगायत’ हा शब्दच धर्मवाचक नाही, तर तो एक दीक्षा संस्कार आहे. वेगळ्या लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या गोष्टीला वीरशैव धर्मगुरूंनी ठामपणे विरोध केला आहे. आम्ही हिंदु आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. ज्या गोष्टीचा अभिमान असायला हवा, त्याची लाज का बाळगायची ? छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच धर्मात जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशाच प्रकारचे हिंदु राष्ट्र आपणाला स्थापन करावयाचे आहे. वेगळ्या लिंगायत धर्माची स्थापना, हे देशावरील धार्मिक आक्रमण आहे.

संघटित आल्यास अशा प्रकारे वेगळ्या धर्माची स्थापना होणार नाही ! – ब्रिजेश शुक्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आपण संप्रदायामध्ये विभागले जात आहोत. रामराज्यात आपले सर्व पूर्वज एकच होते. आपणाला सर्व विश्‍वावर राज्य करायचे आहे. अशा प्रकारे धर्मात फूट पडली तर भारत विश्‍वगुरु कसा होणार ?

आम्ही हिंदु आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही हिंदु आहोत आणि हिंदुच राहू ! – विष्णु जंगम, अध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *