Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात घेतलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटींचा वृत्तांत

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या नेपाळ दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे १८ मार्चपासून नेपाळच्या दौर्‍यावर आहेत. या वेळी त्यांनी हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांचे नेते, धर्माभिमानी, संपादक आदी मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी धार्मिक विचारांची देवाण-घेवाण केली.

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे पुजारी श्री. गणेश रावल (भट्ट) यांच्याशी भेट

श्री. गणेश रावल (भट्ट) यांना गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

काठमांडू (नेपाळ) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे पुजारी श्री. गणेश रावल (भट्ट) यांची नुकतीच भेट घेली. या वेळी त्यांनी श्री. भट्ट यांना गोवा येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाविषयी माहिती दिली, तसेच या अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या वेळी श्री. भट्ट यांनी ‘अधिवेशनाला उपस्थित रहाणे शक्य न झाल्यास आशीर्वाद नक्की पाठवू’, असे सांगितले. या वेळी भट्ट यांनी पशुपतिनाथांची आशीर्वादरूपी रुद्राक्षाची माळ घालून सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा सन्मान केला.

२. पशुपतिनाथ मंदिराचे तिसर्‍या क्रमांकाचे पुजारी श्री. नारायण भट्ट यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे तिसर्‍या क्रमांकाचे पुजारी श्री. नारायण भट्ट यांची सदिच्छा भेट घेतली. श्री. भट्ट मूळ कर्नाटकमधील भटकळ येथील आहेत. त्यांनी भटकळ येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्य चालू असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी ‘आपले हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य यशस्वी होण्यासाठी पशुपतिनाथांच्या चरणी प्रार्थना करीन, तसेच कर्नाटकमध्ये आल्यावर गोव्यातील सनातनच्या आश्रमालाही नक्की भेट देईन’, असे सांगितले.

३. किरात समाजाचे मुन्धुमविद् ज्योतिर्विद् श्री. चंद्र कुमार सेर्मा यांची भेट

श्री. चंद्र कुमार सेर्मा यांना गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील किरात समाजाचे मुन्धुमविद ज्योतिर्विद श्री. चंद्र कुमार सेर्मा यांची नुकतीच भेट घेतली. या ठिकाणी किरात समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून तो स्वत:ला हिंदु धर्माशी जवळचा मानतो. श्री. सेर्मा हे हिंदु राष्ट्राचे समर्थक आहेत. ते नेपाळ हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी संघर्ष करणार्‍या हिंदूंसमवेत नेहमीच उभे राहिले आहेत. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना गोवा येथे जून २०१८ मध्ये होणार्‍या आगामी राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाची माहिती दिली.

४. समाजव्यवस्थेच्या पुनर्रचनेचे खरे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे !– श्री. निरंजन ओझा, फोरम् ऑफ नेपालीज जर्नलिस्ट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘फोरम ऑफ नेपालीज जर्नलिस्ट’चे श्री. निरंजन ओझा यांची भेट घेतली. या वेळी श्री. ओझा यांनी नेपाळमध्ये ख्रिस्त्यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराविषयी चिंता व्यक्त केली. श्री. ओझा म्हणाले, ‘‘आज हिंदूंनाच त्यांच्या धर्माचे ज्ञान नाही. हिंदु जनजागृती समितीप्रमाणे आज कोणतीच संघटना हिंदूंना धर्मशिक्षण देत नाही. समाजव्यवस्थेच्या पुनर्रचनेचे खरे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहेत.’’ गोव्यातील सनातन आश्रमाला दिलेल्या भेटीविषयी ते म्हणाले, ‘‘जिथे आध्यात्मिक ऊर्जा असते, तेच खरे मंदिर आहे. त्याप्रमाणे सनातन आश्रम हा आश्रम नसून मंदिरच आहे.’’ या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाविषयी माहिती दिली.

५. काशी येथील रामानुज संस्कृत विश्‍वविद्यालयाचे शिक्षक श्री. ज्ञानेंद्र सापकोटा यांची भेट

काशी येथील रामानुज संस्कृत विश्‍वविद्यालयाचे शिक्षक श्री. ज्ञानेंद्र सापकोटा नेपाळ गुरुकुल परिषदेच्या गुरुकुल संमेलनासाठी काठमांडू येथे आले असता त्यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भेट घेतली. श्री. ज्ञानेंद्र हे कात्यायनी शाखेचे श्रौत कर्म करतात. त्यांचा अश्‍वमेधयाजी प.पू. नाना (नारायण) काळेगुरुजी यांच्याशी परिचय होता.  या वेळी त्यांनी गोवा येथील सनातनचा आश्रम, तसेच आश्रमात चालणारे यज्ञयाग यांविषयी जाणून घेतले.

६. ‘इंटरनॅशनल बुद्धा अ‍ॅकाडमी’चे श्री. कमल भंडारी यांची सदिच्छा भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी काठमांडू येथील ‘इंटरनॅशनल बुद्धा अ‍ॅकाडमी’चे श्री. कमल भंडारी यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी समितीकडून करण्यात येत असलेले संघटन आणि गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेले संशोधन यांविषयी माहिती दिली. या वेळी त्यांनी भाषेविषयी संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि या कार्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. श्री. भंडारी यांनी वाराणसी आणि गोवा येथील सनातनच्या आश्रमांना भेट देण्याचीही इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *