हिंदूंनो, सरकार कोणतेही आले, तरी ते पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही, हे सत्य जाणा आणि भारतासह जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ आता तरी हिंदु राष्ट्र आणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका (बांगलादेश) : एका हिंदु मुलीने धर्मांतर करण्यास विरोध दर्शवल्याने महंमद हसन आणि इतर २ धर्मांधांनी तिच्यावर अमानवी अत्याचार केले. त्या मुलीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पीडितेवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी बांगलादेशमधील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधला असता पोलिसांनी त्यांना उद्धटपणे उत्तरे देत धमक्याही दिल्या.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कुतुबदिया पोलीस ठाण्यात आरोपीच्या नावासह तक्रार प्रविष्ट करूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी कुतुबदिया पोलीस ठाण्याचे अधिकारी महंमद दिदारूल फिरदोस यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला. त्या वेळी फिरदोस यांनी अधिवक्ता रवींद्र घोष यांना उद्धटपणे उत्तरे दिली. ते अधिवक्ता रवींद्र घोष यांना म्हणाले की, मला जर पोलीस अधीक्षकांनी सांगितले, तरच मी या प्रकरणाविषयीची माहिती तुम्हाला देईन. यानंतर अधिवक्ता रवींद्र घोष यांनी कॉक्स बझार येथील पोलीस अधीक्षक डॉ. इकबाल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘तुम्ही पोलीस महानिरीक्षाकांशी संपर्क करा. मी तुम्हाला माहिती देण्यास बांधील नाही, तसेच यापुढे तुम्ही माझ्याशी संपर्क करू नका.’’
पोलीस अधिकार्यांच्या या वागणुकीविषयी खेद व्यक्त करून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित हिंदु मुलीला संरक्षण देऊन तिच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करावेत, तसेच आरोपींना त्वरित अटक होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात