आमदार भरतशेठ गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्वस्तांनी लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच न्यासातील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, असे मागणी पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना नुकतेच दिले. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर न्यासाच्या घोटाळ्याची माहिती हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी शासनाकडे पत्राद्वारे वरील मागणी केली आहे. या पत्रासमवेत त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेली पुराव्यांची कागदपत्रे जोडली आहेत.
त्या पत्रात म्हटले आहे की,
१. वर्ष २०१६ मध्ये न्यासाच्या केलेल्या पडताळणीत हिंदु विधीज्ञ परिषदेला काही धक्कादायक गोेष्टी आढळून आल्या. यामध्ये १ जानेवारी २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत न्यासाच्या विश्वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्या संदर्भातील अभ्यास दौर्याच्या नावाखाली एकूण १२ लक्ष ९१ सहस्र २९१ रुपये इतका खर्च केला आहे. यामध्ये लॉजिंग, खानपान, प्रवास इत्यादी व्ययाचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर कायदा विश्वस्तांना अशा व्ययाची अनुमतीच देत नाही. त्यामुळे विनाअनुमती अभ्यास दौर्यावर मंदिर विश्वस्तांनी केलेला व्यय नियमबाह्य आहे.
२. या प्रकरणी संबंधित विश्वस्तांवर फसवणूक आणि अफरातफर यांचे गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्याकडून सर्व निधी वसूल करण्यात यावा.
३. गेल्या १० वर्षांतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कारभाराची प्रधान सचिव वा सचिव दर्जाच्या अधिकार्याकडून सखोल चौकशी करून त्यात दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात