हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
नेपाळमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू असल्याची थापा यांची माहिती
काठमांडू (नेपाळ) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपपंतप्रधान श्री. कमल थापा यांची २२ मार्च या दिवशी सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी नेपाळ आणि भारत हिंदु राष्ट्र व्हावे, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र याव्यात यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांना माहिती दिली.
नेपाळमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू असल्याची थापा यांची माहिती
या वेळी एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळला धर्मनिरपेक्ष करण्यासाठी कशा प्रकारे षड्यंत्र रचण्यात आले, याविषयी सांगतांना श्री. थापा म्हणाले, ‘‘सर्वप्रथम ख्रिस्त्यांकडून हिंदू, बौध्द आणि नैसर्गिक धर्म मानणारे आदिवासी यांच्यात फूट पाडण्यात आली, तसेच त्यांच्यावर बौद्धिक आणि शारीरिक आक्रमणही करण्यात आले. वर्ष १९५० मध्ये जेथे २ डझनही ख्रिस्ती नव्हते त्या नेपाळमध्ये आज शेकडो चर्च निर्माण करून मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले जे अजूनही चालू आहे.’’
नेपाळमध्ये हिंदु धर्माविषयी सन्मानाची भावना निर्माण करणे मोठे आव्हान !
हिंदूंची स्वधर्माविषयी असलेल्या उदासीनतेविषयी बोलतांना श्री. थापा म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये हिंदु धर्माविषयीच्या संवेदना अल्प होऊ लागल्या आहेत. येथे ‘धर्माविषयी बोललो, तर आपण प्रतिगामी होऊ’, असे तरुणांना वाटत आहे. आज नेपाळला सक्षम नेतृत्व नाही आणि जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करतात, त्यांच्यात समन्वय नाही. राजकीय पक्षांमुळे हिंदूंचे विभाजन झाले आहे. त्यामुळे नेपाळमध्ये हिंदु धर्माविषयी संवेदना आणि सन्मानाची भावना निर्माण करणे, हे मोठे आव्हान आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात