Menu Close

केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव करू नका ! – राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

डिचोली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आंदोलनांत सहभागी धर्माभिमानी हिंदु

डिचोली : वाळपई आणि उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी हटवले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांना अनधिकृत ठरवून समाजामध्ये भेदभाव करू नका, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली २४ मार्चला सायंकाळी डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ केलेल्या निदर्शनांच्या वेळी केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता.

केंद्र सरकारने हज यात्रेसाठी विमान प्रवासभाड्यामध्ये केलेली भरघोस कपात रहित करावी. भाग्यनगरमध्ये (हैद्राबादमध्ये) रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहतीला दिलेली अनुमती त्वरित रहित करावी आणि भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये. आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे, या मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

शंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनांतून पुढील सूर उमटला. सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा आदेश दिलेला आहे. ख्रिस्ती धर्मियांचे अनेक क्रॉस अधिकृतपणे रस्त्याच्या बाजूने उभारले आहेत. मडगाव येथील मोतीडोंगर येथील अनधिकृत बांधकामे तोडण्याचा आदेश न्यायालयाने अनेक वर्षांपूर्वी दिला आहे. या सर्व अनधिकृत गोष्टींवर कारवाई करावी. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनधिकृत म्हणून त्यांच्यावर तत्परतेने कारवाई करणे आणि अन्य धर्मियांच्या अनधिकृत स्थळांवर कारवाई करण्याकडे कानाडोळा करणे, यामधून स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासन यांचा हिंदूंप्रती असलेला भेदभाव लक्षात येतो. ज्या ज्या संघटना, व्यक्ती अथवा धार्मिक नेते रोहिंग्यांची बाजू घेत आहेत, त्यांच्यासाठी घरे बांधत आहेत, तसेच अन्य साहाय्य करत आहेत, त्यांच्यावरही देशद्रोह्यांचे समर्थक म्हणून कठोर कारवाई करण्यात यावी. हज यात्रेचे अनुदान बंद करून केलेली हवाई प्रवासातील भाडेकपात, म्हणजे हिंदु समाजाच्या डोळ्यांत धूळफेकच आहे. असे करणे हा एकप्रकारे न्यायालयाच्या निर्णयास हरताळ फासल्यासारखेही आहे. शेवटी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन श्री. पंकज बर्वे यांनी केले.

आंदोलनामध्ये सहभागी संघटना

विशाल गोमंतक सेना, शिवप्रेमी संघटना, गोवंश रक्षा अभियान, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती-उसगाव, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा

आंदोलनाला संबोधित केलेल्या वक्त्यांची नावे

शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे श्री. जयेश थळी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती-उसगाव अध्यक्ष श्री. प्रमोद नाईक, विशाल गोमंतक सेनेचे अध्यक्ष श्री. सूरज आरोंदेकर, शिवप्रेमी संघटनेचे अध्यक्ष श्री. विश्‍वराज सावंत, शिवप्रेमी संघटना-वाळपईचे श्री. गौरीश गावस

पुतळे पुनर्स्थापित करेपर्यंत आंदोलन चालूच रहाणार ! – श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

वाळपई आणि उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे काढण्यात आलेले पुतळे पुनर्स्थापित करेपर्यंत आंदोलन चालूच रहाणार आहे. पुतळे हटवणे हा अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचा प्रकार आहे. वाळपई आणि उसगाव परिसरात कितीतरी अनधिकृत बांधकामे आहेत. प्रशासन त्यावर आता कारवाई करणार का ? आजच्या राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, हे ठाऊक नाही.

पुतळे हटवण्यासाठी शासनावर कोणाचा दबाव आहे, याचा शोध घ्या ! – श्री. जयेश थळी, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवण्यासाठी शासनावर कोण दबाव आणत आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. शासन ही कारवाई कोणाला खुश करण्यासाठी करत आहे ? शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन शक्ती जागृत होते आणि हे टाळण्यासाठीच पुतळे हटवले जात आहेत.

उसगाव येथील पुतळा कोणाच्या अनुमतीने काढला ? – श्री. प्रमोद नाईक, अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, उसगाव

उसगाव येथे सर्वांच्या संमतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता; मात्र तो काढतांना प्रशासनाने कोणाची अनुमती घेतली ? हा पुतळा पुनर्स्थापित होईपर्यंत शांत रहाणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *